Video - सरकारी अर्जासाठी रांगेत उभ्या होत्या महिला, राहुल गांधींना पाहताच भेटायला धावल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 05:36 PM2024-01-18T17:36:10+5:302024-01-18T17:42:04+5:30
Rahul Gandhi : शेकडो महिला नव्याने जाहीर झालेल्या सरकारी योजनेचा फॉर्म घेण्यासाठी जमल्या होत्या. याच वेळी काँग्रेस नेते राहुल गांधी हे देखील तिथे आले. त्यावेळी राहुल गांधींना पाहताच सर्व महिला त्याचं स्वागत करण्यासाठी रांग सोडून धावत निघून गेल्या.
आसामच्या जोरहाटमध्ये गुरुवारी शेकडो महिला नव्याने जाहीर झालेल्या सरकारी योजनेचा फॉर्म घेण्यासाठी जमल्या होत्या. याच वेळी काँग्रेस नेते राहुल गांधी हे देखील तिथे आले. त्यावेळी राहुल गांधींना पाहताच सर्व महिला त्यांचं स्वागत करण्यासाठी रांग सोडून धावत निघून गेल्या. सध्या राहुल गांधी भारत जोडो न्याय यात्रेचं नेतृत्व करत आहेत.
गुरुवारी दुपारी काँग्रेसचे नेते शिवसागर येथून मरियानी शहरात पोहोचले. नाकाचारी परिसरातील शासकीय केंद्राबाहेर ग्रामीण महिला रांगेत उभ्या असल्याचं त्यांनी पाहिलं. त्यानंतर राहुल गांधींचा ताफा पाहताच महिला रांग सोडून रस्त्याकडे धावल्या. ताफा थांबताच राहुल त्यांच्या बसमधून बाहेर आले.
भारत जोड़ो न्याय यात्रा के पांचवें दिन के दौरान मरियानी में असम के मुख्यमंत्री द्वारा आयोजित एक समारोह में शामिल होने आई महिलाएं खुद बेहद उत्साह के साथ आकर @RahulGandhi से मिलीं।
— Jairam Ramesh (@Jairam_Ramesh) January 18, 2024
असम के लिए न्याय की शुरुआत हो चुकी है! pic.twitter.com/QD318kDefn
अनेक महिलांनी राहुल गांधी यांच्या पायाला स्पर्श केला. यावेळी राहुल यांनी महिलांना असं करण्यापासून रोखण्याचाही प्रयत्न केला. महिलांनी त्यांच्यासोबत फोटो काढण्याचा प्रयत्न केला. राहुल यांनी महिलांशी संवाद साधला आणि नंतर बोलता बोलता ते पुढे निघून गेले.
राहुल गांधींसोबत या यात्रेत काँग्रेसचे नेते जयराम रमेश हे देखील होते. ट्विटरवर त्यांनी या घटनेचा व्हिडीओ शेअर केला आहे. "भारत जोडो न्याय यात्रेच्या पाचव्या दिवशी आसामच्या मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मारियानी येथे आलेल्या महिला स्वतःहून मोठ्या उत्साहात राहुल गांधींची भेट घेण्यासाठी आल्या. आसामसाठी न्यायाची सुरुवात झाली आहे."
राहुल गांधी यांनी 14 जानेवारी रोजी मणिपूर येथून भारत जोडो न्याय यात्रा सुरू केली होती. ही यात्रा 20 मार्चला मुंबईत संपणार आहे. या कालावधीत 67 दिवसांत 15 राज्यांतील 110 जिल्हे कव्हर केले जाणार आहेत.