उमेदवारांना पक्षाकडून पुरेसा निधी न मिळाल्याने काँग्रेसचा पराभव : माजी मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 05:14 PM2019-05-27T17:14:09+5:302019-05-27T17:16:27+5:30
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पक्षाच्या अध्यक्षपदी कायम राहिल्यास, पक्षाला काहीही नुकसान होणार नाही. त्यांना आता अध्यक्षपदाचा चांगला अनुभव आला असल्याचे वीरभद्र यांनी सांगितले.
मुंबई - हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वीरभद्र सिंग यांनी लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या पराभवाचे कारण सांगितले. काँग्रेसच्या उमेदवाराना निवडणुक लढविण्यासाठी पक्षाकडून पुरेसा निधी मिळाला नसल्याचा दावा वीरभद्र सिंग यांनी केला आहे.
पक्षाकडून उमेदवारांना निवडणूक लढविण्यासाठी पुरेसा निधी मिळाला नाही. त्यामुळे निवडणूक प्रचाराला गती येऊ शकली नाही, असं वीरभद्र यांनी म्हटले. तसेच त्यांनी पक्ष नेतृत्वाला टोला लगावताना म्हटले की, लोकसभा निवडणूक लढवत असताना राष्ट्रीय पक्षाकडे पुरेशा प्रमाणात साधनसामग्री आवश्यक असते.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पक्षाच्या अध्यक्षपदी कायम राहिल्यास, पक्षाला काहीही नुकसान होणार नाही. त्यांना आता अध्यक्षपदाचा चांगला अनुभव आला असल्याचे वीरभद्र यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर नैतिकता दाखवत राहुल यांनी राजीनामा देऊ केला होता. मात्र पक्षाकडून एकमुखाने त्यांचा राजीनामा फेटाळण्यात आला आहे.
यावेळी वीरभद्र सिंह यांनी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्यावर देखील टीका केली. भारतीय जनता पक्षाच्या विजयामागे ठाकूर यांचे काहीही योगदान नाही. भाजपला राज्यात जो विजय मिळाला त्याची कारणं वेगळी असल्याचे त्यांनी म्हटले.