विरोधकांचा दिल्लीत मार्च; सत्ताधाऱ्यांचा पलटवार! अधिवेशन संपताच संसदेबाहेर रणकंदन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2021 07:14 AM2021-08-13T07:14:53+5:302021-08-13T07:16:52+5:30
राज्यसभेत खासदारांना मार्शलनी धक्काबुक्की केल्याचा निषेध
- व्यंकटेश केसरी
नवी दिल्ली : राज्यसभेत बुधवारी मार्शलनी खासदारांना धक्काबुक्की केली असा आरोप करत काँग्रेससहित अन्य विरोधी पक्षांच्या नेत्यांनी गुरुवारी दिल्लीतील विजय चौक ते राष्ट्रपती भवन असा मोर्चा काढला. त्यानंतर राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांची भेट घेऊन विरोधी पक्षांच्या नेत्यांनी बुधवारच्या प्रकाराबद्दल तीव्र निषेध नोंदविला. दुसरीकडे, विरोधी पक्षांनी संसदीय मर्यादशीलतेचे उल्लंघन केले असून, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करत सरकारच्या ८ मंत्र्यांनीही जोरदार पलटवार केला आहे.
संसदेचे पावसाळी अधिवेशन १३ ऑगस्ट रोजी संपणार होते. पण त्याच्या दोन दिवस आधीच लोकसभा, राज्यसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले. पेगॅससपासून इतर मुद्द्यांबाबत विरोधी पक्षांमध्ये असलेली एकजूट या अधिवेशनात दिसली. त्याला तडे देण्याचे केंद्र सरकारचे प्रयत्न यशस्वी होऊ शकले नाहीत. काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी या विरोधी पक्षांच्या नेत्यांना लवकरच चर्चेसाठी बोलाविणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. गुरुवारच्या निषेध मोर्चानंतर विरोधी पक्षांनी जारी केलेल्या संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, संसदीय सुरक्षा व्यवस्थेचा भाग नसलेल्या तसेच राज्यसभेबाहेर तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांना सभागृहात बोलाविण्यात येऊन त्यांच्याकरवी विरोधी पक्षातील महिला खासदारांसह इतर खासदारांनाही धक्काबुक्की करण्यात आली.
खासदारांच्या गैरवर्तनाबद्दल व्यंकय्या नायडूंची नाराजी
मार्शलना राज्यसभेत बोलाविण्याच्या व त्यांनी खासदारांनी केलेल्या धक्काबुक्कीची चौकशी करण्याचे आश्वासन सभापती व्यंकय्या नायडू यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या शिष्टमंडळाला दिले. काही सदस्यांनी केलेले वर्तन योग्य नव्हते. त्याबद्दल योग्य कारवाई झाली पाहिजे, असेही नायडू म्हणाले.
मोदीजी, तुम्ही किती घाबरता? काँग्रेसचा संतप्त सवाल
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे अकाउंट लॉक केल्यानंतर ट्विटरने आता थेट काँग्रेस पक्षाचेच अधिकृत मुख्य अकाउंट लॉक केले आहे. मोदीजी, तुम्ही किती घाबरता? असा संतप्त सवाल काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केला आहे.
सोनिया गांधी यांनी बोलाविली विरोधी पक्षांची बैठक
काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मोदी सरकारविरुद्ध आघाडी उघडली असून, २० ऑगस्ट रोजी विरोधी पक्षांच्या नेत्यांची व्हर्च्युअल बैठक बोलाविली आहे. सूत्रांनी सांगितले की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह इतर नेते या बैठकीला हजर राहणार आहेत.
आठ मंत्र्यांनी केली कठोर कारवाईची मागणी
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, प्रल्हाद जोशी, मुख्तार नक्वी, धमेंद्र प्रधान, भूपेंद्र यादव, अनुराग ठाकूर, अर्जुन मेघवाल, व्ही. मुरलीधरन यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत विरोधी पक्षांवर निशाणा साधला.
विरोधकांनी संसद आणि लोकशाहीच्या मर्यादाशीलतेचे उल्लंघन केले. या बेफाम वर्तनाबद्दल कठोर शिक्षा दिली जावी. जेणेकरुन असे करणाऱ्यांना शंभरवेळा विचार करावा लागेल, असेही या मंत्र्यांनी म्हटले आहे.