कोट्यवधी लोकांचा आवाज दाबला जातोय; बेरोजगारीवरून राहुल गांधी यांचा सरकारवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2021 08:21 AM2021-09-04T08:21:22+5:302021-09-04T08:21:29+5:30
राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, सर्वात मोठा राष्ट्रीय मुद्दा बेरोजगारीचा आहे.
शीलेश शर्मा
नवी दिल्ली : देशात वाढत असलेल्या बेरोजगारीबाबत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. त्यांनी ट्विट केले आहे की, मोदी सरकार रोजगारासाठी हानिकारक आहे. ठराविक लोकांशिवाय अन्य व्यवसाय व रोजगाराला ते मदत करत नाहीत. तर, ज्यांच्याकडे नोकरी आहे अशा लोकांची नोकरी हिसकावत आहेत. देशवासीयांना आत्मनिर्भरतेचे ढोंग अपेक्षित आहे.
राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, सर्वात मोठा राष्ट्रीय मुद्दा बेरोजगारीचा आहे. यावर काही थेट उपाययोजना आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम विक्री करू नका. सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग यांना मदत करा. मित्रांची नको, देशाची काळजी करा. पण, केंद्र सरकारला तोडगा काढण्याची इच्छा नाही.
लघुचित्रपट
राहुल गांधी यांनी वडील राजीव गांधी यांच्यासोबतच्या क्षणांवर आधारित एक लघु चित्रपट जारी केला आणि सांगितले की, त्यांनी देशाची परिस्थिती कशा प्रकारे समजून घेतली. लोकांच्या समस्या, संघर्ष जाणून घेतला. भारत की आवाज हा लघु चित्रपट राजीव गांधी यांच्या जीवनावर आधारित आहे. राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, आजच्या राजकारणाची ही सर्वात मोठी विडंबना आहे की, फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सॲप यांसारख्या सोशल मीडियाच्या युगात आवाज दाबला जात आहे.