मतदानाचा टक्का घसरला; फायदा नेमका कुणाला? तिसऱ्यांदा विजयी होण्याचा भाजपला विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2024 02:01 PM2024-05-28T14:01:25+5:302024-05-28T14:02:04+5:30
इंडिया आघाडीलाही आश्चर्यकारक यश मिळण्याची आशा
हरीश गुप्ता, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीचा अखेरचा टप्पा एक आठवड्यावर येऊन ठेपला आहे. १९ एप्रिलपासून सर्व सहा टप्प्यांमध्ये मतदान होत असल्याने राजकीय विश्लेषकांमध्येही मतमतांतरे दिसत आहेत. सातव्या टप्प्याचे मतदान १ जून रोजी आहे. १ जून रोजीच्या संभाव्य एक्झिट पोलमधून काही स्पष्टता मिळू शकते. तथापि, पुन्हा नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार, असा दावा एनडीएचे नेते करत आहेत, तर इंडिया आघाडीला आश्चर्यकारक संख्या मिळण्याची अपेक्षा आहे.
पंतप्रधानांनी दिल्या ७१ मुलाखती
आणखी एक चिंताजनक बाब म्हणजे बहुसंख्य शहरी मतदारसंघांत चेन्नई, लखनौ, गांधीनगर, मुंबई उत्तर, जयपूर, गुवाहाटी, जबलपूर, मथुरा, दिल्ली एनसीटी आणि इतर शहरांत २ टक्के ते १२ टक्के कमी मतदान झाले आहे. पंतप्रधानांनी मतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी तब्बल ७१ मुलाखती दिल्या. भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वाने सूचित केले आहे की, दावा केल्याप्रमाणे ३७० नव्हे तर ३०३ ची २०१९ ची संख्या कायम ठेवण्यात त्यांना खूप आनंद होईल.
आकडे बोलतात...
- २०१४ मध्ये ६७ टक्क्यांहून अधिक व २०१९ मध्ये ६८.६% मतदान झाले होते. त्या तुलनेत २०२४ मध्ये मतदान कमी झाले. त्यामुळे आकड्यांचा अंदाज लावणे कठीण झाले आहे.
- मतदारांची उदासीनता, कमी झालेली मोदी लाट, उष्णतेची लाट आणि इतर कारणांमुळे कमी मतदान दिसून आल्याचे अनेकांना वाटते.
- सहाव्या टप्प्यात मतदानाची टक्केवारी ६३.४ टक्के झाली हे भाजपसाठी सकारात्मक आहे.