राहुल गांधींनी घराचा पत्ता बदलला? जुने घर पाहिजे की नको, आठ दिवसांत उत्तर मागितले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2023 05:40 AM2023-08-18T05:40:32+5:302023-08-18T05:40:52+5:30
राहुल गांधी पुन्हा एकदा सरकारी बंगल्यात परतण्यास तयार आहेत; परंतु त्यांचे घर १२, तुघलक लेन नव्हे तर ७, सफदरजंग लेन असू शकते.
आदेश रावल, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचा ७, सफदरजंग लेन हा नवीन पत्ता असू शकतो. खासदारकी बहाल झाल्यानंतर राहुल गांधी पुन्हा एकदा सरकारी बंगल्यात परतण्यास तयार आहेत; परंतु त्यांचे घर १२, तुघलक लेन नव्हे तर ७, सफदरजंग लेन असू शकते. सध्या राहुल गांधी १२ तुघलक लेनच्या जागी नवीन पर्यायाच्या शोधात आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जुने घर पाहिजे की नको याबाबत लोकसभा सचिवालय कार्यालयाने राहुल गांधी यांना आठ दिवसांत उत्तर देण्यास सांगितले आहे.
लडाखमध्ये बाईक ट्रिप...
राहुल गांधी दोन दिवसांच्या लडाख दौऱ्यावर रवाना झाले आहेत. केंद्रशासित प्रदेश झाल्यानंतर राहुल गांधी लडाखच्या दौऱ्यात पहिल्यांदाच लेह आणि कारगिलला भेट देणार आहेत. राजकीय कार्यक्रमांव्यतिरिक्त राहुल लडाखमध्ये बाईक ट्रिपही करणार आहेत.
राहुल यांच्यासाठी हा बंगला का विशेष?
राहुल गांधी यांनी आपल्या मातोश्री सोनिया गांधी आणि बहीण प्रियंका गांधी यांच्याबरोबर २ वेळा ७, सफदरजंग लेनस्थित घर पाहिले आहे. हा बंगला राहुल गांधी यांच्यासाठी विशेष आहे, कारण याच्या शेजारीच इंदिरा गांधी यांचे संग्रहालयही आहे. हा बंगला टाइप ७च्या श्रेणीत येतो. यात ४ बेडरूम आहेत. राहुल गांधी यांच्या झेड प्लस सुरक्षा श्रेणीमध्ये हा बंगला योग्य बसतो. सध्या हे घर महाराज रणजित सिंह गायकवाड यांना दिलेले आहे.