"कुठे आहेत ते... त्यांना बोलवा", काँग्रेस आमदार मंचावरूनच सरकारी अधिकाऱ्यांवर संतापले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2024 04:29 PM2024-10-07T16:29:09+5:302024-10-07T16:29:44+5:30
काँग्रेस आमदार विवेक पटेल हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर चांगलेच संतापले.
वरासिवनी : काँग्रेसच्या आमदाराने थेट मंचावरच सरकारी अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त केल्याचे समोर आले आहे. मध्य प्रदेशातील वरासिवनी-खैरलांजी जनपद पंचायत परिसरात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी खासदार, आमदार आणि इतर लोकप्रतिनिधी याठिकाणी आधीच हजर होते, मात्र, ज्याच्या कामासाठी सगळ्यांना बोलावले होते, ती व्यक्तीच दिसून आली नाही. त्यामुळे आमदार इतके संतापले की त्यांनी मंचावरूनच सरकारी अधिकाऱ्यांनाच धारेवर धरत रागाच्या भरात विचारले, कुठे आहेत ते? असा सवाल केला.
दरम्यान, जवळपास २ कोटी १९ लाख रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या खुर्शीपार ते अटारी रस्त्याचे भूमिपूजन खुर्शीपार गावात करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात खासदार भारती पारधी, या मतदारसंघातील काँग्रेस आमदार विवेक पटेल, माजी आमदार प्रदीप जैस्वाल आदी लोकप्रतिनिधी उपस्थित होते. मात्र, या रस्त्याचे काम ज्या ठेकेदाराला देण्यात आले होते. ते ठेकेदार यावेळी उपस्थित नव्हते. त्यानंतर काँग्रेस आमदार विवेक पटेल हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर चांगलेच संतापले.
भूमिपूजन कार्यक्रमात मंचावरून बोलताना आपल्या भाषणात आमदार विवेक पटेल यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त करत या रस्त्याचे काम ज्यांना करायचे आहे, ते ठेकेदार कुठे आहेत? असा सवाल करत ठेकेदारांना बोलवा, असे म्हणाले. त्यानंतरही आमदार विवेक पटेल हे पुन्हा पुन्हा विचारत राहिले की, ठेकेदार कुठे आहेत? ठेकेदार कुठे आहेत, त्यांना बोलवा. दरम्यान, ठेकेदार या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते.
या कार्यक्रमाला उपस्थित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना ताकीद देताना आमदार म्हणाले की, भविष्यात अशा चुका होऊ नयेत. हा रस्ता दर्जेदार व्हावा, असे आमदार विवेक पटेल यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. तसेच, कोणत्याही प्रकारची तक्रार नसावी. रस्त्याच्या बांधकामादरम्यान अधिकाऱ्यांसह आमचे लोकप्रतिनिधी आणि कामगारही गुणवत्ता तपासतील, असेही आमदार विवेक पटेल म्हणाले.