Rahul Gandhi : "प्रियंका वायनाडचा आवाज बनून संसदेत तुमच्या हक्कांसाठी लढणार"; राहुल गांधींनी केलं आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2024 12:02 PM2024-11-13T12:02:05+5:302024-11-13T12:02:31+5:30
Wayanad Election 2024 Congress Rahul Gandhi And Priyanka Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर वायनाड पोटनिवडणुकीसंदर्भात महत्त्वपूर्ण संदेश दिला आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर वायनाड पोटनिवडणुकीसंदर्भात महत्त्वपूर्ण संदेश दिला आहे. राहुल गांधी यांनी वायनाडच्या जनतेला त्यांची बहीण प्रियंका गांधी यांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. त्यांनी ट्विट करून प्रियंका गांधी या निवडणुकीत पूर्णपणे तयार आहेत आणि त्या वायनाडचा आवाज बनून संसदेत तुमच्या हक्कांसाठी लढणार असल्याचं देखील म्हटलं आहे.
राहुल गांधींनी आपल्या ट्विटमध्ये प्रियंका गांधी यांची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, प्रियंका गांधी केवळ प्रतिनिधी म्हणून काम करणार नाहीत तर त्या वायनाडच्या लोकांसाठी बहीण, मुलगी आणि वकील म्हणून काम करणार आहेत. वायनाडच्या विकासात प्रियंका गांधी महत्त्वाची भूमिका बजावतील आणि त्या पूर्ण क्षमता वापरतील, असा त्यांचा विश्वास आहे.
I’m reaching out to my family in Wayanad—this election, my sister Priyanka Gandhi is ready to be your voice in Parliament.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) November 13, 2024
She will be more than just a representative—she will be your sister, your daughter, and your advocate. I am confident she will help unlock Wayanad’s full…
मतदान करण्याचं केलं आवाहन
राहुल गांधींनी वायनाडच्या जनतेला या निवडणुकीत प्रियंका गांधींना पाठिंबा देण्याचं आणि मतदानात सहभागी होण्याचं खास आवाहन केलं. "आपण एकत्र येऊ आणि प्रियंका गांधी यांचा विजय निश्चित करू. ही निवडणूक वायनाडच्या विकासासाठी आणि लोकांच्या हक्कांसाठी विशेष आहे. मी तुम्हाला तुम्ही तुमचं मत द्या आणि या ऐतिहासिक बदलाचा एक भाग व्हा असं आवाहन करतो" असंही राहुल यांनी म्हटलं आहे.
"वायनाडचं भविष्य उज्ज्वल होईल"
राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वाखाली वायनाडच्या उज्ज्वल भविष्याची आशा व्यक्त केली आहे. ते म्हणतात की, प्रियंका गांधी यांची संसदेत उपस्थिती वायनाडच्या लोकांना अधिक शक्ती आणि संधी प्रदान करेल. प्रियंका गांधी त्यांच्या कृती आणि वृत्तीने वायनाडमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यास सक्षम आहेत, असंही ते म्हणाले.