दिग्विजय सिंह यांच्यामुळेच आम्ही बंगळुरूमध्ये; काँग्रेसच्या बंडखोर आमदारांचे आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 04:40 PM2020-03-18T16:40:20+5:302020-03-18T16:41:03+5:30
आमदार मनोज चौधरी यांनी दिग्विजय सिंह यांना भेटण्यासाठी तयार असल्याचे म्हटले आहे. मात्र त्यासाठी एक अट ठेवली आहे. दिग्विजय सिंह यांनी आपल्या पिपल्या मतदार संघाचा दौरा करून रस्त्याची दुर्दशा पाहावी. तसेच ज्या शेतकऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल झाले त्यांची भेट घ्यावी, अशी अट चौधरी यांनी ठेवली आहे.
नवी दिल्ली - काँग्रेसच्या बंडखोर आमदारांनी, बंगळुरू येथे दाखल झालेले काँग्रेसनेतेदिग्विजय सिंह यांना भेटण्यास नकार दिला आहे. आमदारांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करून दिग्विजय सिंह यांनीच काँग्रेसमध्ये फुट पाडल्याचा आरोप केला आहे.
दिग्विजय सिंह यांनी काँग्रेसमध्ये फूट पाडली आहे. त्यांच्यामुळेच आम्ही भोपाळमधून फरार झालो आणि बंगळुरू येथे दाखल झाल्याचे आमदारांचे म्हणणे आहे. त्यामुळे दिग्विजय सिंह यांना आम्ही भेटणार नसल्याचे आमदारांनी स्पष्ट केले. दिग्विजय सिंह आमदारांना भेटण्यासाठी आज सकाळी बंगळुरू येथे दाखल झाले होते.
दिग्विजय सिंह यांनी आमदारांना भेटण्यासाठी आग्रह केल्यानंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. काही वेळाने त्यांना सोडून देण्यात आले. या कालावधीत काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झालेल्या बिसाहुलाल सिंह यांनी कर्नाटकच्या डीजीपींना पत्र पाठवून सुरक्षा देण्याची मागणी केली होती.
ज्योतिरादित्य शिंदे समर्थक आमदारांचे बंगळुरू येथून वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. यामध्ये सर्व आमदार आपआपले म्हणणे मांडत आहेत. मात्र सर्वांच्या म्हणण्यानुसार आम्ही आमच्या मर्जीने येथे आलो आहोत.
दरम्यान आमदार मनोज चौधरी यांनी दिग्विजय सिंह यांना भेटण्यासाठी तयार असल्याचे म्हटले आहे. मात्र त्यासाठी एक अट ठेवली आहे. दिग्विजय सिंह यांनी आपल्या पिपल्या मतदार संघाचा दौरा करून रस्त्याची दुर्दशा पाहावी. तसेच ज्या शेतकऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल झाले त्यांची भेट घ्यावी, अशी अट चौधरी यांनी ठेवली आहे.