जागावाटपाची चर्चा दाेन आठवड्यात पूर्ण करू; काँग्रेसने ‘इंडिया’तील पक्षांना दिले संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2024 09:04 AM2024-01-02T09:04:07+5:302024-01-02T09:04:55+5:30
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे जागावाटपाची चर्चा जलद व्हावी यासाठी उत्सुक आहेत. जेणेकरून, इंडिया आघाडी शक्य तेथे संयुक्त सभा घेऊ शकेल.
हरीश गुप्ता -
नवी दिल्ली : काँग्रेस नेतृत्वाने लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीच्या सहकारी पक्षांना १५ जानेवारीपूर्वी जागावाटपाची चर्चा पूर्ण करण्यास उत्सुक आहे, असे संकेत दिले आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे जागावाटपाची चर्चा जलद व्हावी यासाठी उत्सुक आहेत. जेणेकरून, इंडिया आघाडी शक्य तेथे संयुक्त सभा घेऊ शकेल.
राहुल गांधी यांच्या जवळच्या सूत्रांकडून समजलेल्या माहितीनुसार, बिहारचे मुख्यमंत्री प्रमुख नितीश कुमार यांना इंडिया आघाडीचे निमंत्रक बनविण्यास पक्षाचा विरोध नाही; परंतु यामुळे आघाडीला धक्का लागू नये, असे त्यांचे मत आहे. मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि इतर काही राज्यांमध्ये काँग्रेसने आपल्या मित्रपक्षांना त्यांच्यासोबत जागा वाटून घेण्याचे संकेत दिले आहेत.
४ जानेवारीनंतर चर्चा सुरू होणार
- काँग्रेस ४ जानेवारीनंतर इंडिया आघाडीतील सहकारी पक्षांसोबत जागा वाटपावर औपचारिक संभाषण सुरू करेल. तत्पूर्वी त्यांच्या राज्यातील नेत्यांकडून त्या त्या राज्यातील परिस्थितीबद्दल अहवाल सादर होणार आहे.
- राज्यातील नेत्यांना स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की, विधानसभेच्या निवडणुकीप्रमाणे जास्त जागांवर दावा करू नये. मध्य प्रदेशातील नेत्यांना स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की, त्यांना मित्रपक्षांसाठी जागा सोडाव्या लागतील.
- काही राज्ये आहेत जिथे मतभेद आहेत; पण एनडीएचा धोका लक्षात घेऊन इंडिया आघाडीतील मित्रपक्ष १५ जानेवारीपर्यंत जागा वाटप पूर्ण करण्यास उत्सुक आहेत.