‘गुजरातमध्ये जुनी पेन्शन योजना लागू करू’, राहुल गांधींचे आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2022 08:50 AM2022-09-21T08:50:57+5:302022-09-21T08:51:30+5:30
जुनी पेन्शन योजना रद्द करून भाजपने ज्येष्ठांचे स्वावलंबन हिरावून घेत त्यांना परावलंबी केले
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : भाजपने जुनी पेन्शन योजना गुंडाळून ज्येष्ठांना इतरांवर अवलंबून राहण्यास भाग पाडल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी येथे केला. जुनी पेन्शन योजना देशाला बळकट करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांचा हक्क असल्याचे सांगून गुजरातमध्ये काँग्रेस सत्तेवर आल्यास जुनी पेन्शन योजना लागू केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
जुनी पेन्शन योजना रद्द करून भाजपने ज्येष्ठांचे स्वावलंबन हिरावून घेत त्यांना परावलंबी केले. देशाला बळकट करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांचा हा हक्क आहे. जुनी पेन्शन, असे त्यांनी हिंदीत केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. आम्ही राजस्थान व छत्तीसगडमध्ये जुनी पेन्शन योजना लागू केली आहे. आता गुजरातमध्ये काँग्रेस सरकार येणार असून तेथेही जुनी पेन्शन योजना लागू केली जाईल, असे राहुल यांनी काँग्रेस देगी ओल्ड पेन्शन या हॅशटॅगचा वापर करत म्हटले. जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी गुजरातमधील हजारो निवृत्त कर्मचाऱ्यांनी अलीकडेच निदर्शने केली होती.