West bengal Assembly Election : राहुल गांधी करणार प. बंगालमध्ये प्रचार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2021 01:34 AM2021-04-11T01:34:27+5:302021-04-11T01:34:54+5:30
West bengal Assembly Election : प. बंगालमध्ये प्रचार करतील. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून भाजपाविराेधातील लढाईत मदत मागितली आहे.
- हरीश गुप्ता
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी हे पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांच्या शेवटच्या टप्प्यासाठी प्रचार करणार असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अधीररंजन चौधरी यांनी शनिवारी सांगितले.
लोकमतला दूरध्वनीद्वारे दिलेल्या विशेष मुलाखतीत अधीररंजन चौधरी यांनी सांगितले की, केवळ राहुल गांधीच नव्हे, तर प्रियांका गांधीही प. बंगालमध्ये प्रचार करतील. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून भाजपाविराेधातील लढाईत मदत मागितली आहे. या पार्श्वभूमीवर ७ व्या व ८ व्या टप्प्यातील निवडणुकीत २२ विधानसभा मतदारसंघातून तृणमूलने काँग्रेससाठी आपले उमेदवार मागे घ्यावेत, अशी आमची मागणी आहे. काँग्रेस १०० पेक्षा कमी जागा लढवित आहे. २०१६ च्या निवडणुकीत आघाडी करून निवडणुका लढविल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस आमदारांना लालूच दाखवून आमच्या पाठीत खंजीर खुपसलेला आहे. ममता बॅनर्जी ही निवडणूक हरत आहेत. नंदिग्रामची जागाही त्या जिंकू शकणार नाहीत. भाजपाला रोखणे हा काँग्रेस-सीपीएम-आयएसएफ आघाडीचा उद्देश आहे. निवडणुकीनंतर गरज भासल्यास तृणमूल काँग्रेसला पाठिंबा देणार का, या प्रश्नावर चौधरी यांनी सांगितले की, याबाबतचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील.