ममतांनी घेतली सोनिया गांधींची भेट; 'या' मोठ्या मुद्यांवर झाली चर्चा; राहुल गांधीही होते उपस्थित
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 06:23 PM2021-07-28T18:23:14+5:302021-07-28T18:24:55+5:30
ममतांनी सोनिया गांधींची भेट घेण्यापूर्वी विरोधी पक्षांना एकत्रित येण्याचे आवाहन केले होते. विरोधी पक्षांनी एकत्रित यावे, अशी सोनिया गांधींची इच्छा आहे, असेही ममता म्हणाल्या होत्या.
नवी दिल्ली - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्या पाच दिवसीय दौऱ्यात आज तिसऱ्या दिवशी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांची भेट घेतली. सध्या देशभरात विरोधी पक्षांच्या एकजुटीवर चर्चा सुरू असतानाच ममतांनी ही भेट घेतली आहे. तसेच, पेगासीस, कृषी कायदे आणि महागाईच्या मुद्द्यांवर संसद ठप्प आहे. अशातच झालेल्या या भेटीला अत्यंत महत्व आहे. (West bengal CM Mamata Banerjee meets congress president Sonia Gandhi and Rahul Gandhi also in delhi)
या महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा -
सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर ममता म्हणाल्या, सोनिया गांधींसोबतची भेट अत्यंत सकारात्मक झाली. विरोधी पक्षांची एकी, पेगासीस आणि सध्याची राजकीय परिस्थिती यांवर चर्चा झाली. भाजपला हरविण्यासाठी एकत्रित यावे लागेल. पेगासीस मुद्द्यावर ममता म्हणाल्या, यावर सरकार उत्तर का देत नाही. सरकारने संसदेत उत्तर द्यावे.
ममतांनी सोनिया गांधींची भेट घेण्यापूर्वी विरोधी पक्षांना एकत्रित येण्याचे आवाहन केले होते. विरोधी पक्षांनी एकत्रित यावे, अशी सोनिया गांधींची इच्छा आहे, असेही ममता म्हणाल्या होत्या. काँग्रेसला स्थानिक पक्षांवर विश्वास आहे.
ममता म्हणाल्या सर्व स्थानिक पक्ष एकत्रित आल्यास, एका पक्षाला भारी ठरतील. 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांची एकजूट आणि चेहरा, यांवर बोलताना त्या म्हणाल्या, मी काही राजकीय ज्योतिषी नाही. त्यावेळच्या स्थितीवर सर्व अवलंबून असेल. जर कुणी दुसऱ्यानेही नेतृत्व केले, तरी समस्या नाही. त्या म्हणाल्या, कुणाला तरी नेतृत्व करावेच लागेल. वेळ आली, की चर्चा करू. मत थोपवण्याची माझी इच्छा नाही. मी सोनिया गांधी आणि अरविंद केजरीवाल यांना भेटत आहे. कालच लालू यादवने फोनवर चर्चा केली. आम्ही रोज चर्चा करत आहोत. आणखी तीन वर्ष आहेत. आम्ही चर्चा करत आहोत.