हरयाणा निकालाने राहुल गांधींना झटका, महाराष्ट्रात काँग्रेससमोर सर्वात मोठं आव्हान?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2024 01:54 PM2024-10-08T13:54:47+5:302024-10-08T13:56:37+5:30
हरयाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राहुल गांधी यांनी मोठा धक्का बसल्याचे दिसत आहे.
Congress Haryana Election Results :हरयाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालांच्या ताज्या आकडेवारीनुसार काँग्रेसचा पराभव होत असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. मजमोजणी सुरु होताच काँग्रेसने मोठी आघाडी घेतल्याने कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरु केला होता. मात्र काही वेळातच चित्र पालटलं आणि भाजपने मोठी आघाडी घेतली. निवडणूक आयोगाच्या कलानुसार ९० जागांच्या हरयाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला केवळ ३५ जागा मिळताना दिसत आहेत. दुसरीकडे, भाजप तिसऱ्यांदा विजय मिळवत हरयाणामध्ये इतिहास घडवणार आहे.
विधानसभा निवडणुकीत हरयाणातील हा पराभव काँग्रेससाठी मोठा धक्का ठरू शकतो, असे म्हटलं जात आहे. या पराभवामुळे राहुल यांच्या निवडणूक रणनीतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते, असेही बोलले जात आहे. त्यामुळे आगामी महाराष्ट्र आणि झारखंडच्या महत्त्वाच्या विधानसभा निवडणुकांवरही याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत मोठं यश मिळालं होतं. त्यावेळी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे मनोबल उंचावले आहे. मात्र या निकालाने चित्र बदलण्याची शक्यता आहे.
काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी यांनी जम्मू-काश्मीर आणि हरयाणाच्या निवडणुका जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले होते. दुसरीकडे, वर्षाच्या अखेरीस महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे या निवडणुकांचा काँग्रेससाठी महत्त्वाचा ठरणार असल्याचे मानले जात होते. मात्र हरियाणातील निकालाची परिस्थिती पाहता तिथल्या निकालाने कदाचित कार्यकर्त्यांचे मनोधैर्य खचू शकते. तसेच याचा परिणाम दोन्ही राज्यांच्या आगामी विधानसभा निवडणुकांवरही होऊ शकतो.
हरयाणा विधानसभा निवडणुकीत मोठं यश मिळणार असल्याचा दावा काँग्रेसकडून केला जात होता. भाजपच्या १० वर्षांच्या सत्तेनंतर तिथे सत्तापरिवर्तन होईल, असेही म्हटलं जात होतं. भाजप सरकारचे दिवस आता गेले आहेत आणि आता हरयाणात काँग्रेसचे सरकार येणार असल्याचे राहुल आपल्या सभांमध्ये सांगत होते. मात्र आता भाजप इथे इतिहास रचणार असून तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे.
महाराष्ट्रावर होणार परिणाम?
काँग्रेसच्या वतीने राहुल गांधी सातत्याने महाराष्ट्रात प्रचार करत आहेत. त्यांनी अनेक सभांना घेतल्या आहेत. तसेच भाजपलाही महाराष्ट्रा कोणत्याही किंमतीत स्वतःकडे ठेवायचे आहे. यासाठी भाजपही महाराष्ट्रातही आपली ताकद वापरत आहे. त्यामुळे यावेळी महाराष्ट्रात होणारी विधानसभा निवडणुकीची लढत चुरशीची होणार आहे. हरयाणामधील विजयामुळे भाजप महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये आपली ताकद कितीतरी पटीने वेगाने वाढवू शकतो.
दरम्यान, यावेळी हरयाणात काँग्रेसच्या विजयाचे दावे सातत्याने केले जात होते आणि तसा प्रचारही केला जात होता. राहुल गांधी स्वतः या निवडणुकीत खूप सक्रिय होते. पण, या पराभवामुळे काँग्रेसचे मनोधैर्य खचण्याची शक्यता आहे. यामुळे राहुल गांधींच्या निवडणूक रणनीतीवरही प्रश्न उपस्थित होऊ शकतात, असेही म्हटलं जात आहे.