राहुल गांधींशी नाव जोडल्या गेलेल्या अदिती सिंह आहेत तरी कोण?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2018 01:06 PM2018-05-07T13:06:30+5:302018-05-07T13:06:30+5:30
अदिती सिंह नुकत्याच आपल्या कुटुंबीयांसह गांधी परिवाराचे निवासस्थान असलेल्या 10 जनपथ येथे गेल्या होत्या.
मुंबई: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भावी पत्नी म्हणून अचानक प्रसिद्धीझोतात आलेल्या काँग्रेस आमदार अदिती सिंह यांची सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरू आहे. त्यामुळे आता अनेकांच्या मनात अदिती यांच्याबद्दल कुतूहल निर्माण झाले आहे. अदिती सिंह नुकत्याच आपल्या कुटुंबीयांसह गांधी परिवाराचे निवासस्थान असलेल्या 10 जनपथ येथे गेल्या होत्या. तेव्हा राहुल गांधींसोबत टिपण्यात आलेले त्यांचे छायाचित्र चर्चेसाठी निमित्त ठरले. तेव्हापासून राहुल गांधी आणि त्यांचं लग्न ठरल्याच्या बातम्या कानावर पडत होत्या.
यापूर्वी अदिती सिंह उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्यावेळी चर्चेत आल्या होत्या. पहिल्यांदाच निवडणुकीला उभ्या राहिलेल्या अदिती सिंह यांनी रायबरेली मतदारसंघातून 50 हजारांच्या मताधिक्याने विजय मिळवला होता. यापूर्वी आदित्य यांचे वडील अखिलेश सिंह रायबरेलीतून पाचवेळा विधानसभेवर निवडून गेले होते. त्यामुळे उत्तर प्रदेशातील सामर्थ्यशाली राजकारण्यांमध्ये त्यांची गणना होते.
अदिती सिंह यांनी ड्यूक विद्यापीठातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर अमेरिकेत जाऊन त्यांनी पुढील शिक्षण घेतले होते. आदिती सिंह या 29 वर्षांच्या असून प्रियांका गांधी यांच्या जवळच्या वर्तुळातील मानल्या जातात. उत्तर प्रदेशातील मोदी लाटेतही अदिती यांनी 90 हजारांच्या मताधिक्याने विजय मिळवल्यामुळे पक्षाला त्यांच्याकडून भविष्यात अनेक आशा आहेत. त्यामुळेच राहुल गांधी यांच्या तरूण नेत्यांच्या टीममध्ये अदिती सिंह यांना स्थान मिळण्याची दाट शक्यता आहे.