लोकसभेत कोण होणार काँग्रेसचा नेता; निर्णय अद्याप रखडलेलाच
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2019 10:21 AM2019-06-17T10:21:22+5:302019-06-17T10:22:48+5:30
काँग्रेसचा लोकसभेतील नेता ठरविण्यात आलेला नाही. याचा निर्णय पक्ष नेतृत्वाकडे प्रलंबित आहे. मात्र पश्चिम बंगालचे काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी आणि केरळचे के. सुरेश यांच्यापैकी एका नेत्याची काँग्रेसच्या लोकसभेच्या नेतेपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात विचारमंथन झाले. खुद्द काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत राजीनामा देऊ केला. मात्र त्यांचा राजीनामा पक्षाकडून नाकारण्यात आला. या घडामोडी घडत असताना संसदेचे आधिवेशन आजपासून सुरू झाले असून अजुनही काँग्रेसचा लोकसभेतील नेता कोण होणार यावर शिक्कामोर्तब झाले नाही.
लोकसभेत काँग्रेसचा नेता कोण होणार याचा निर्णय पक्ष नेतृत्वाकडे प्रलंबित आहे. संसदेचे अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. त्यामुळे विरोधकांना एकमेकांमध्ये समन्वय राखणे गरजेचे आहे. मात्र विरोधकांमध्ये कुणाचाच कुणाला मेळ नसल्याचे चित्र आहे. सरकारला महत्त्वाच्या मुद्दावर घेरण्यासाठी विरोधकांची रणनिती आखण्यासंदर्भात अद्याप एकही बैठक झालेली नाही.
एका काँग्रेस नेत्याने सांगितले की, लोकसभेतील अनेक विरोधी पक्षांना त्यांचा लोकसभेतील नेता निश्चित करता आलेला नाही. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच संसदेच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांची बैठक होईल. खुद्द काँग्रेसकडून देखील लोकसभेतील नेत्यासंदर्भात चर्चा झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान काँग्रेसचा लोकसभेतील नेता ठरविण्यात आलेला नाही. याचा निर्णय पक्ष नेतृत्वाकडे प्रलंबित आहे. मात्र पश्चिम बंगालचे काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी आणि केरळचे के. सुरेश यांच्यापैकी एका नेत्याची काँग्रेसच्या लोकसभेच्या नेतेपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे.