हार्दिक पटेल यांनी काँग्रेस का सोडली? अखेर समोर आलं मोठं कारण, राहुल गांधींवर साधला निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 08:38 PM2022-05-18T20:38:37+5:302022-05-18T20:39:19+5:30
Hardik Patel News: गुजरातमधील फायरब्रँड नेते हार्दिक पटेल यांनी आज अखेर काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. मात्र जाता जाता ते पक्षाच्या नेतृत्वाबाबत असं काही बोलून गेले की त्याची चर्चा होऊ लागली आहे.
नवी दिल्ली - गुजरातमधील फायरब्रँड नेते हार्दिक पटेल यांनी आज अखेर काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. मात्र जाता जाता ते पक्षाच्या नेतृत्वाबाबत असं काही बोलून गेले की त्याची चर्चा होऊ लागली आहे. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीवेळी हार्दिक पटेल, अल्पेश ठाकोर आणि जिग्नेश मेवानी हे राहुल गांधी यांच्या युवा ब्रिगेडचे सदस्य होते. त्यांनी तेव्हा भाजपाच्या तोंडचे पाणी पळवले होते. मात्र त्या युवा ब्रिगेडमधील दोघांनी आता राहुल गांधींची साथ सोडली आहे. अल्पेश ठाकोर यांच्यानंतर हार्दिक पटेलही काँग्रेसमधून बाहेर पडले आहेत.
पक्षात होत असलेल्या उपेक्षेमुळे नाराज होऊन हार्दिक पटेल यांनी सांगितले की, त्यांचं म्हणणं ऐकून घेण्यापेक्षा दिल्लीतील नेत्यांसाठी चिकन सँडविच खाणं अधिक महत्त्वाचं वाटतं. यापूर्वी सध्याचे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनीही राहुल गांधींवर असाच आरोप केला होता. राहुल गांधींनी त्यांचं म्हणणं ऐकण्याऐवजी पाळलेल्या पिडी या कुत्र्याला अधिक महत्त्व दिलं, असा आरोप सरमा यंनी केला होता.
काँग्रेस सोडणाऱ्या या सर्व नेत्यांमधील साम्य म्हणजे त्यातील बहुतांश नेत्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. त्याशिवाय अजून एक साम्य म्हणजे हे सर्व नेते राहुल गांधी यांचे निकटवर्तीय होते. किंवा राहुल गांधींनीच त्यांची निवड केली होती. सुरुवातीला ते राहुल गांधींच्या खांद्याला खांदा लावून काम करत होते. मात्र हळुहळू परिस्थिती बदलत गेली आणि काही गोष्टी चुकीच्या होत गेल्या.
ज्या सर्व नेत्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली त्यातील सर्वांनी एकच उत्तर दिलं की, राहुल गांधींसोबत त्यांचे कुठलेही मतभेद नव्हते. मात्र त्यांना राहुल गांधीच्या भोवती असलेल्या मंडळींपासून अडचण होती. आपण थेट राहुल गांधींना भेटतो हे त्यांना आवडत नसे. अखेरीस राहुल गांधीही त्याच लोकांवर विश्वास ठेवू लागतात. त्यामुळेच मी राहुल गांधींना दोष देतो, असे एका नेत्याने सांगितले.