पीएफ, एलआयसी, एसबीआयचे पैसे का गुंतवले?; राहुल गांधी यांचा सवाल, देशभरात तीव्र आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 08:47 AM2023-03-28T08:47:26+5:302023-03-28T08:47:59+5:30
केंद्राला चौकशीची भीती का?, राहुल गांधी यांचा सवाल
नवी दिल्ली : ‘अदानी समूहात जनतेचा पैसा का गुंतवला जात आहे आणि सरकार चौकशी करण्यास का घाबरत आहे,’ असा सवाल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी केला आहे. दरम्यान, देशभरात विविध ठिकाणी काँग्रेसकडूनराहुल गांधी यांच्या अपात्रतेप्रकरणी निषेध करण्यात आला. अनेक राज्यांत विधानसभांतही या प्रश्नावरून गदारोळ झाला.
राहुल गांधी यांनी ट्विट केले, एलआयसीचे भांडवल अदानींकडे! एसबीआयचे भांडवल अदानींकडे! ईपीएफओचे भांडवलही अदानींकडे! ‘मोदानी’ने पर्दाफाश करूनही जनतेचा निवृत्तीचा पैसा अदानींच्या कंपन्यांमध्ये का गुंतवला जात आहे? पंतप्रधानजी चौकशी नाही, उत्तर नाही! एवढी भीती कशाची?”. यानंतर भाजपनेही काँग्रेसवर टीका केली आहे. राहुल गांधी यांना खासदार म्हणून अपात्र ठरविल्याच्या विरोधात काँग्रेससह विरोधी पक्ष देशभरात रस्त्यावर उतरले. देशात प्रत्येक राज्यात केंद्र सरकारविरोधात आंदोलन करण्यात आले. विरोधी पक्षनेत्यांनी संसदेच्या संकुलात ठिय्या मांडला होता.
भाजपमध्ये नव्याने सहभागी झालेले पुरी हे आपली निष्ठा दाखवण्यासाठी प्रक्षोभक विधाने करतात. अशी विधाने त्याचे स्वतःचे चरित्र कसे आहे ते दाखवतात. - जयराम रमेश, काँग्रेस
स्वप्नातही सावरकर होऊ शकत नाही...
राहुल गांधी यांनी अलीकडेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर प्रखर टीका केल्याप्रकरणी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी ‘तुम्ही स्वप्नातही कधीच सावरकर होऊ शकत नाही. कारण सावरकर होण्यासाठी दृढनिश्चय, भारतावर प्रेम, नि:स्वार्थीपणा आणि वचनबद्धता लागते. ठाकूर यांनी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांच्या अभिमानामुळे त्यांनी आपल्या कुटुंबाची भगवान रामाच्या कुळाशी तुलना केल्याची टीकाही केली.
काँग्रेस-ठाकरे गटात तणाव वाढला
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका करणाऱ्या राहुल गांधींना आवर घालण्यावरून काँग्रेसची भूमिका स्पष्ट होईपर्यंत सहकार्य करायचे नाही, असे उद्धव ठाकरे गटाने ठरविले आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आयोजित केलेल्या सोमवारी सायंकाळच्या भोजनापाठोपाठ विरोधी पक्षांच्या मंगळवारी सकाळी संसद भवनात होणाऱ्या बैठकीतही सहभागी होणार नसल्याचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले. ‘तुम्ही गांधी आहात हे ठीक आहे, पण तुम्ही सावरकर नाही हे सांगायची गरज नाही. सावरकर हा महाराष्ट्रातील संवेदनशील विषय आहे. त्यांच्यावर टीका करून तुम्ही कारण नसताना भाजपच्या हाती हत्यार देत आहात, असे आम्ही काँग्रेसला वारंवार बजावत आहोत,’ असे राऊत म्हणाले.