...अन् दान करण्यासाठी काढलेले 500 रुपये राहुल गांधींनी पुन्हा खिशात ठेवले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2018 10:09 AM2018-10-17T10:09:03+5:302018-10-17T10:11:16+5:30
राहुल गांधींच्या मध्य प्रदेश दौऱ्यादरम्यानची घटना
भोपाळ: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सध्या मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. डिसेंबरमध्ये मध्य प्रदेशात विधानसभेची निवडणूक आहे. त्यामुळे राज्यात राहुल गांधींच्या प्रचारसभा, बैठका सुरू आहेत. राहुल गांधी विविध धर्मस्थळांदेखील भेटी देत आहेत. काल राहुल गांधी ग्वाल्हेरमधील दाताबंदी छोड गुरुद्वाऱ्यात गेले होते. त्यावेळी तिथे घडलेल्या एका घटनेनं उपस्थितांपैकी अनेकांचं लक्ष वेधलं.
एका स्थानिक वृत्तपत्रानं दिलेल्या वृत्तानुसार, गुरुद्वाऱ्यात नमस्कार केल्यानंतर राहुल गांधी यांनी दानपेटीत टाकण्यासाठी 500 रुपयांची नोट काढली. मात्र तितक्यात त्यांच्या मागे उभ्या असलेले खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांनी त्यांना रोखलं. सिंधिया यांनी राहुल यांना राज्यात आचारसंहिता लागू असल्याची आठवण करुन दिली. यानंतर लगेचच राहुल यांनी 500 रुपयांची नोट पुन्हा खिशात ठेवली. ग्वाल्हेर-चंबळ भागाच्या दौऱ्याची सुरुवात राहुल यांनी दाताबंदी छोड गुरुद्वाऱ्याच्या भेटीनं केली. यावेळी प्रदेशाध्यक्ष कमलनाथ, खासदार ज्योतिरादित्य सिंधिया आणि दीपक बावरिया त्यांच्यासोबत होते.
राहुल गांधी यांनी गुरुद्वाऱ्यात नमस्कार केला. यानंतर गुरुद्वारा समितीनं राहुल यांचं स्वागत केलं. ग्वाल्हेर-चंबळच्या दौऱ्याची सुरुवात गुरुद्वारा भेटीनं करणारे राहुल गांधी त्यानंतर अचलेश्वर मंदिर आणि मोती मशिदीत गेले. मध्य प्रदेशात 28 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होईल. यानंतर 11 डिसेंबरला निवडणुकीचा निकाल लागेल.