ब्लॅक मॅजिकनं कोसळेल काँग्रेस सरकार? शत्रु भैरवी यज्ञ, अघोरी अन्...; डीके शिवकुमार यांचा खळबळजनक दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2024 13:47 IST2024-05-31T13:46:21+5:302024-05-31T13:47:49+5:30
मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि राज्यातील काँग्रेस सरकार विरोधात केरळमधील एका मंदिरात ‘शत्रु भैरवी यज्ञ’ नावाचे अनुष्ठान केले जात आहे. यात प्राण्यांचा बळी दिला जातो, असे शिवकुमार यांनी म्हटले आहे...

ब्लॅक मॅजिकनं कोसळेल काँग्रेस सरकार? शत्रु भैरवी यज्ञ, अघोरी अन्...; डीके शिवकुमार यांचा खळबळजनक दावा
कर्नाटकातील सिद्धारामय्या सरकारला कथित काळ्या जादूने सरकार कोसळण्याची भीती वाटू लागली आहे. केरलमधून कर्नाटक सरकार पाडण्याचा कट आखला जात असल्याचा दावा राज्याचे उपमुख्यमंत्री सीएम डीके शिवकुमार यांनी केला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि राज्यातील काँग्रेस सरकार विरोधात केरळमधील एका मंदिरात ‘शत्रु भैरवी यज्ञ’ नावाचे अनुष्ठान केले जात आहे. यात प्राण्यांचा बळी दिला जातो, असे शिवकुमार यांनी म्हटले आहे. एवढेच नाही तर, कर्नाटकातील काही नेते हे काम करून घेत आहेत. यासाठी अघोरींची मदत घेतली जात आहे, असा आरोपही त्यांनी कुणाचे नाव न घेता केला आहे.
डीके शिवकुमार हे सध्या एक ब्रेसलेट परिधान करत आहेत. यासंदर्भात त्यांना विचारले असता ते म्हणाले, 'माझ्या आणि आमच्या सरकारविरोधात केरळमध्ये एक मोठा प्रयोग सुरू आहे. यासंदर्भात कुणी मला लेखी माहिती दिली आहे. ही पूजा कुठे होत आहे आणि कोण करत आहे? हे देखील मला सांगण्यात आले आहे.' हे आपल्या आणि मुख्यमंत्र्यांच्या विरोधात केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. ते पत्रकारांसोबत बोलत होते.
शिवकुमार यांच्या दाव्याने खळबळ -
डीके शिवकुमार म्हणाले, ‘शत्रूचा नाश करण्यासाठी केरळमधील राजराजेश्वरी मंदिराजवळ शत्रु भैरवी यज्ञ केला जात आहे. या यज्ञासाठी ‘पाच बळी’ अर्पण करण्यात येत आहे. अघोरींशी संपर्क साधला जात आहे. तसेच, केरळमध्ये हा यज्ञ कोण करत आहे? यासंदर्भात अनुष्ठानात सहभागी असलेल्यांनीच आपल्याला माहिती दिली आहे, असेही त्यांनी सांगितले.
अशा यज्ञ आणि कर्मकांडांवर आपला विश्वास आहे का? असे विचारले असता, 'हे व्यक्तीच्या श्रद्धेवर अवलंबून आहे. त्यांना माझ्याविरोधात काहीही प्रयोग करू द्या, एक शक्ती आहे, जिच्यावर माझा विश्वास आहे. ती माझे रक्षण करेल,’ असे ते म्हणाले.