काँग्रेसला २००४ च्या पुनरावृत्तीची आशा, २००१ मध्ये सोनिया गांधी यांनी आखलेली रणनीती वापरणार? भाजपाला हरवणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2024 05:34 PM2024-01-05T17:34:15+5:302024-01-05T17:35:32+5:30

Lok Sabha Election 2024: २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये २००४ च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाची पुनरावृत्ती करण्याचा काँग्रेसचा मानस आहे. त्यामुळे या बैठकीत २००१ च्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये सोनिया गांधींच्या नेतृत्वात तयार करण्यात आलेल्या रणनीतीबाबत विशेष चर्चा झाली.

Will Congress hope for a 2004 repeat, use the strategy devised by Sonia Gandhi in 2001? BJP will be defeated | काँग्रेसला २००४ च्या पुनरावृत्तीची आशा, २००१ मध्ये सोनिया गांधी यांनी आखलेली रणनीती वापरणार? भाजपाला हरवणार

काँग्रेसला २००४ च्या पुनरावृत्तीची आशा, २००१ मध्ये सोनिया गांधी यांनी आखलेली रणनीती वापरणार? भाजपाला हरवणार

काही महिन्यांवर आलेल्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचा पराभव करण्यासाठी कांग्रेसकडून जोरदार मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. नुकतीच लोकसभेची निवडणूक आणि राहुल गांधींच्या भारत न्याय यात्रेच्या तयारीसाठी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची पक्षाच्या मुख्यालयात बैठक झाली. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीसाठी अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस,  प्रभारी, प्रदेशाध्यक्ष आणि राज्याच्या विधानसभांमधील काँग्रेच्या नेत्यांना बोलावण्यात आले होते.  २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये २००४ च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाची पुनरावृत्ती करण्याचा काँग्रेसचा मानस आहे. त्यामुळे या बैठकीत २००१ च्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये सोनिया गांधींच्या नेतृत्वात तयार करण्यात आलेल्या रणनीतीबाबत विशेष चर्चा झाली.

नुकत्याच झालेल्या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमध्ये तीन राज्यांत पराभव झाल्यानंतर काँग्रेसचे सूर काहीसे मवाळ झाले आहेत. काँग्रेसकडून  इंडिया आघाडीतील घटक पक्षांना झुकतं माप दिलं जात आहे. पक्षाने बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना इंडिया आघाडीचे संयोजकपद देण्यासही तयारी दर्शवली आहे. तसेच जागावाटपामध्ये केवळ २५५ जागांवर समाधान मानण्याची मानसिक तयारीही काँग्रेरसच्या नेत्यांनी केली आहे. २०१९ मध्ये काँग्रेसने लोकसभेच्या ४२१ जागा लढवल्या होत्या. त्यामध्ये पक्षाला केवळ ५२ जागा जिंकता आल्या होत्या. आता २०१९ पेक्षा कमी जागा लढवण्यास तयार असलेल्या कांग्रेसने विविध राज्यांमधील स्थानिक पक्षांबाबत मवाळ भूमिका घेण्याचं धोरण अवलंबलेलं आहे. दरम्यान, काँग्रेसकडून सध्या उचलण्यात येत असलेली पावले काँग्रेसच्या २००१ मध्ये बंगळुरू येथे झालेल्या अधिवेशनात सोनिया गांधींनी आखलेल्या रणनीतीने  प्रभावित झालेली दिसत आहेत.

काँग्रेसच्या २००१ मधील अधिवेशनात सोनिया गांधींनी २००४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस १५ पक्षांच्या यूपीए या आघाडीसह  अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वातील एनडीएविरोधात मैदानात उतरेल, असे घोषित केले होते. मात्र २००४ मध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसने ६ समविचारी  पक्षांसोबत आघाडी केली होती. त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, आंध्र प्रदेशमध्ये टीआरएस, तामिळनाडूमध्ये डीएमके, झारखंडमध्ये जेएमएम आणि बिहारमध्ये आरजेडी-एलजेपीसोबत आघाडी केली होती. त्यावेळी या राज्यांमध्ये काँग्रेसला जबरदस्त फायदा झाला होता. मात्र त्यावेळी काँग्रेसने उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि पंजाबमध्ये कुठल्याही पक्षासोबत आघाडी केली नव्हती. 

आघाडी केलेल्या पाच राज्यांमधील लोकसभेच्या १८८ जागांपैकी ११४  जागांवर काँग्रेसला विजय मिळाला होता. तर काँग्रेसच्या मित्रपक्षांनी ५६ जागांवर बाजी मारली होती. यावेळीही काँग्रेस २००४ ची रणनीती घेऊन मैदानात उतरण्याची शक्यता आहे. काँग्रेसने रायपूरमध्ये झालेल्या आपल्या ८५ व्या अधिवेशनामध्ये २०२४ च्या लोकभा निवडणुकीसाठी २००४ मधील रणनीती वापरण्याचे निश्चित केले होते. 

योगायोगाची बाब म्हणजे २००३ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये पराभवाचा सामना केला होता. मात्र लोकसभा निवडणुकीत जोरदार पुनरागमन करताना पक्षाने दणदणीत विजय मिळवला होता. आता त्याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.  

Web Title: Will Congress hope for a 2004 repeat, use the strategy devised by Sonia Gandhi in 2001? BJP will be defeated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.