मध्यप्रदेशात 'कोरोना व्हायरस' वाचवणार कमलनाथ सरकार ?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2020 03:08 PM2020-03-13T15:08:53+5:302020-03-13T15:11:19+5:30
देशात कोरोना व्हायरसचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे अनेक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे कमलनाथ सरकार देखील बजेट सत्र पुढे ढकलण्याचा विचार करत आहे. जेणेकरून या कालावधीत नाराज आमदारांची नाराजी दूर करता येईल. एकूणच कोरोनामुळे कमलनाथ सरकारला काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली - मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी नुकतीच राज्यपाल लालजी टंडन यांची भेट घेतली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मध्यप्रदेश विधानसभेचे अधिवेशन कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रभावामुळे पुढे ढकलण्यात येऊ शकते. असं झाल्यास कोरोनामुळे कमलनाथ सरकारला काही काळ अभय मिळणार हे निश्चित.
काँग्रेसनेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर 22 आमदारांनी आपला राजीनामा दिला आहे. त्यामुळे कमलनाथ यांचे सरकार अल्पमतात आले आहे. याचा लाभ घेण्याची भाजपची योजना आहे. विधानसभा अध्यक्ष नर्मदा प्रसाद प्रजापती यांनी राजीनामा देणाऱ्या 22 आमदारांपैकी 13 आमदारांना नोटीस बजावली आहे. राजीनामा दिलेल्या आमदारांनी आज किंवा उद्या उपस्थित राहून राजीनामा स्वखुशीने दिला की दडपणात हे स्पष्ट सांगावे, असं आवाहन प्रजापती यांनी केले आहे.
दरम्यान विधानसभेचे बजेट सत्र पुढं ढकलल्यास याचा कमलनाथ सरकारला फायदा होऊ शकतो. कारण सत्र सुरू होताच, भाजपकडून बहुमत सिद्ध करण्याची मागणी करण्यात येऊ शकते. या स्थितीत विद्यमान कमलनाथ सरकारकडे संख्याबळ नाही. दुसरीकडे देशात कोरोना व्हायरसचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे अनेक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. कमलनाथ सरकार देखील कोरोनामुळे बजेट सत्र पुढे ढकलण्याचा विचार करत आहे. जेणेकरून या कालावधीत नाराज आमदारांची नाराजी दूर करता येईल.एकूणच कोरोनामुळे सत्र लांबवल्यास कमलनाथ सरकारला काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे.