विदेशात कोरोनाने मरण पावलेल्यांच्या वारसदारांना भरपाई मिळणार का?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2021 08:51 AM2021-11-18T08:51:25+5:302021-11-18T08:51:47+5:30
न्यायालयाचा सवाल; केरळ सरकारने भूमिका स्पष्ट करावी
कोची : विदेशात राहणारी केरळी व्यक्ती कोरोनाने मरण पावल्यास तिच्या वारसदारांना पन्नास हजार रुपयांची भरपाई मिळणार का, असा सवाल केरळउच्च न्यायालयाने राज्य सरकारला विचारला आहे. याप्रकरणीच्या याचिकेवर राज्य सरकारने भूमिका स्पष्ट करावी, असा आदेशही न्यायालयाने दिला.
बुधवारी झालेल्या सुनावणीत केरळ सरकारच्या वकिलाने न्यायालयाला सांगितले की, ही याचिका कोणी दाखल केली आहे, त्या संस्थेेचे नाव राज्य सरकारला माहिती आहे. त्यावर तांत्रिक बाबींमध्ये न शिरता राज्य सरकारने आपली भूमिका मांडावी, असे न्यायालयाने सांगितले. प्रवासी लीगल सेल या स्वयंसेवी संस्थेेचे अध्यक्ष व ॲड. जोस अब्राहम यांनी आपल्या याचिकेद्वारे योग्य मुद्दे उपस्थित केले आहेत, असे केरळ उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
ही तर मूलभूत हक्कांची गळचेपी
विदेशात मरण पावलेल्या वारसदारांचे हक्क नाकारणे ही त्यांच्या मूलभूत हक्कांची गळचेपी आहे ,असे प्रवासी लीगल सेल या स्वयंसेवी संस्थेेने केरळ उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे. याप्रकरणी केरळ सरकारकडे दाद मागूनही आम्हाला काहीही प्रतिसाद मिळाला नाही, असा आरोपही याचिकादाराने केला आहे.