काँग्रेसच्या पक्षसंघटनेत मोठे फेरबदल होणार? भविष्यातील रणनीतीच्या दृष्टीने मोठं पाऊल उचलणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2024 06:45 AM2024-06-15T06:45:50+5:302024-06-15T06:46:36+5:30
Congress News: लोकसभा निवडणुकीतील आपली आणि आपल्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीची कामगिरी समाधानकारक असल्याचे लक्षात घेऊन काँग्रेसने भविष्यासाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. यासाठी जबाबदारी निश्चित करून पक्षसंघटनेत मोठ्या बदलाची तयारी पक्षाकडून सुरू आहे.
- आदेश रावल
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीतील आपली आणि आपल्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीची कामगिरी समाधानकारक असल्याचे लक्षात घेऊन काँग्रेसने भविष्यासाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. यासाठी जबाबदारी निश्चित करून पक्षसंघटनेत मोठ्या बदलाची तयारी पक्षाकडून सुरू असून, जवळपास अर्धा डझनहून अधिक प्रदेशाध्यक्ष आणि काही राज्यांचे प्रभारी सरचिटणीस बदलण्यात येणार आहेत.
हिमाचल काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा प्रतिभा सिंह, छत्तीसगडचे प्रदेशाध्यक्ष दीपक बैज, बिहार प्रदेशाध्यक्ष अखिलेश प्रसाद सिंह, झारखंड प्रदेशाध्यक्ष राजेश ठाकूर, उत्तराखंड प्रदेशाध्यक्ष करणसिंह माहरा, मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जितू पटवारी आणि पश्चिम बंगालचे प्रदेशाध्यक्ष अधीररंजन चौधरी यांना बदलले जाऊ शकते. तेलंगणात मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष अशी दुहेरी जबाबदारी सांभाळणारे रेवंत रेड्डी हे प्रदेशाध्यक्षपद सोडू शकतात.
झारखंडचे माजी मंत्री आलमगीर आलम यांच्या जागी नवीन नियुक्ती पक्षाकडून लवकरच होऊ शकते. काँग्रेसचे लक्ष सध्या महाराष्ट्र, हरयाणा आणि झारखंडवर आहे, जिथे लवकरच विधानसभा निवडणुका होत आहेत.
महाराष्ट्रात काय होणार?
काँग्रेससाठी महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि हरयाणामधील लोकसभा निवडणुकीचे निकाल चांगले राहिले आहेत. त्यामुळे या राज्यांचे प्रदेशाध्यक्ष बदलले जाणार नाहीत. दिल्ली, हरयाणा काँग्रेसचे प्रभारी दीपक बावरिया आणि ओडिशा, तामिळनाडूचे प्रभारी अजॉय कुमार यांच्याकडून फेरबदलात प्रत्येकी एक राज्य काढून घेतले जाण्याची चर्चा आहे.