येचुरी होते राहुल यांचे दुसरे राजकीय गुरू; शरद यादव पहिले राजकीय गुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2024 08:01 AM2024-09-13T08:01:12+5:302024-09-13T08:01:40+5:30
यादव यांच्या निधनानंतर त्यांच्या कन्या सुभाषिनी यादव यांची राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या सचिवपदी निवड केली होती.
आदेश रावल
नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे दुसरे गुरू व माकप नेते सीताराम येचुरी यांचे निधन झाले आहे. जनता दल (युनायटेड)चे माजी अध्यक्ष शरद यादव हे राहुल गांधी यांचे पहिले गुरू होते.
राहुल गांधी व सीताराम येचुरी यांचे अतिशय स्नेहाचे संबंध होते. ते येचुरींशी विविध विषयांवर तासनतास चर्चा करत असत. देशातील गोरगरीब जनतेच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्रयत्न करणे अतिशय महत्त्वाचे आहे हे तत्त्व येचुरी यांनी राहुल गांधी यांच्या मनावर बिंबवले होते. ते नेहमी येचुरी यांच्या घरी जात असत. तसेच पहिले गुरू शरद यादव यांच्याही घरी जाऊन राहुल गांधी चर्चा करत. जातनिहाय जनगणना करण्याच्या मागणीसाठी ते आग्रही आहेत. यादव यांच्या निधनानंतर त्यांच्या कन्या सुभाषिनी यादव यांची राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या सचिवपदी निवड केली होती.
देशाची सखोल जाण असलेला नेता
माकप नेते सीताराम येचुरी हे देशातील स्थितीची सखोल जाण असलेले नेते होते. भारत संकल्पनेचे ते संरक्षक होते. येचुरी हे माझे मित्र होते. त्यांच्याशी मी विविध विषयांवर प्रदीर्घ चर्चा केल्या होत्या. आता त्या साऱ्या आठवणी दाटून आल्या आहेत. - राहुल गांधी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते
राष्ट्रीय राजकारणासाठी मोठी हानी
येचुरी यांचे निधन ही राष्ट्रीय राजकारणासाठी मोठी हानी आहे. ते अत्यंत कुशल संसदपटू होते. त्यांचे राहणीमान अतिशय साधे होते.
- ममता बॅनर्जी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री
सीताराम येचुरी हे देशाच्या कम्युनिस्ट चळवळीतील अतिशय महत्त्वाचे नेते होते. त्यांच्या निधनामुळे देशाचे अपरिमित नुकसान झाले आहे. त्यांनी केवळ डाव्या पक्षांनाच नव्हे, तर भारतीय राजकारणाला उत्तम दिशा देण्याचे कार्य केले. - पिनाराई विजयन, केरळचे मुख्यमंत्री
बहुपेडी व्यक्तिमत्त्वाचा प्रगल्भ नेता
माझे मित्र व संसदेतील सहकारी तसेच माकपचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांच्या निधनाचे वृत्त ऐकून धक्का बसला. मी त्यांना सीता तर ते मला कॉम्रेड या नावाने हाक मारत असू. जेएनयूमधून शिक्षण घेतलेल्या प्रगल्भ व्यक्तिमत्त्वांपैकी ते एक होते. त्यांनी माझ्या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली होती. त्या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाप्रसंगी आमची भेट झाली होती. काही महत्वाच्या मुद्द्यांबाबत चर्चा करण्यासाठी आपण पुन्हा भेटूया असे त्यांनी त्यावेळी मला सांगितले होते. सीताराम येचुरी यांचे सर्वच राजकीय पक्षांत मित्र होते. त्यांचे बहुपेडी व्यक्तिमत्व व तत्वांवरील अढळ निष्ठा याबद्दल ते सर्वांच्याच स्मरणात राहातील. त्यांच्या कुटुंबीयांच्या, प्रियजनांच्या दु:खात मी सहभागी आहे. - डॉ. विजय दर्डा, लोकमतच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन व माजी राज्यसभा खासदार