सरकारने राज्यावर अडीच लाख कोटींचे कर्ज लादले, अजित पवार यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2018 06:10 AM2018-10-09T06:10:48+5:302018-10-09T06:15:50+5:30
भाजपाने निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने पाळलेली नाहीत. या सरकारने जनतेची घोर निराशा केली आहे. युती शासनाच्या चार वर्षांच्या कार्यकाळात राज्यावर अडीच लाख कोटींचे कर्ज वाढले असल्याची टीका राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते अजित पवार यांनी केली आहे.
नवी मुंबई : भाजपाने निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने पाळलेली नाहीत. या सरकारने जनतेची घोर निराशा केली आहे. युती शासनाच्या चार वर्षांच्या कार्यकाळात राज्यावर अडीच लाख कोटींचे कर्ज वाढले असल्याची टीका राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते अजित पवार यांनी केली आहे.
वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात कोकण विभाग राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मेळाव्यात अजित पवार बोलत होते. ते पुढे म्हणाले की, सरकारची प्रशासनावर पकड नाही. राज्यात स्थिती विदारक असताना मुख्यमंत्री फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री व्हायचे आहे. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी दिलेली नाही. दुष्काळाची स्थिती असूनही दुष्काळ घोषित केला जात नाही. नोटाबंदीमुळे प्राप्त झालेल्या नकली नोटा आणि काळ्या पैशाचा हिशोब केंद्रीय अर्थमंत्री किंवा आरबीआयचे गव्हर्नरदेखील देत नाहीत. शासनाच्या निर्णयावर जनता खूश नाही. भाजपाचे अनेक ज्येष्ठ नेतेसुद्धा नाराज आहेत. सरदार वल्लभभाई पटेलांच्या स्मारकापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची उंची कमी करण्याचा केविलवाणा प्रयत्नदेखील भाजपा सरकार करीत असल्याचा आरोप त्यांनी या वेळी केला. नोटाबंदी, आर्थिक मंदी, कर्जबुडवे यामुळे देशातील बँकांचा एनपीए ७ लाख ३४ हजार कोटींवर गेला असल्याचा आरोप पवार यांनी केला.
राज्य सरकारमध्ये सुमारे अडीच लाख जागा रिक्त आहेत. राष्ट्रवादीचे सरकार राज्यातील तरुणांना रोजगार देण्याच्या अनुषंगाने एकही जागा रिक्त राहणार नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. या सरकारविरोधात आंदोलन उभे करण्याची गरज असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
या मेळाव्याला सुनील तटकरे, गणेश नाईक, आमदार संदीप नाईक, शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड, अनिकेत तटकरे, महापौर जयवंत सुतार, अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार, नवी मुंबई युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष सूरज पाटील उपस्थित होते.
मुंबई कोणावाचून थांबणार नाही
संजय निरुपम यांच्या वक्तव्याविषयी विचारले असता पवार यांनी सांगितले, ज्या राज्यात राहतो तेथील स्थानिकांच्या भावना दुखावण्याचे वक्तव्य कोणी करू नये. ठरावीक घटकांनी काम न केल्यास मुंबई बंद पडेल यात तथ्य नाही. मुंबई २४ तास चालणारे शहर आहे, विकासात सर्वांचा वाटा असतो. कोणा एकामुळे शहर थांबणार नाही.
पार्थ पवार यांची मेळाव्याला हजेरी
नवी मुंबईत आयोजित केलेल्या युवक राष्ट्रवादी काँगे्रसच्या मेळाव्याला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार उपस्थित होते. व्यासपीठाऐवजी ते कार्यकर्त्यांमध्ये बसले होते. माजी मंत्री गणेश नाईक यांनी त्यांना व्यासपीठावर बोलावले. पार्थ यांची उपस्थिती चर्चेचा विषय बनला होता. पार्थ यांच्या राजकीय प्रवेशाबाबत अजित पवार यांना प्रश्न केला असता पक्षश्रेष्ठी याबाबत योग्य निर्णय घेतील, असे त्यांनी सांगितले.