'शिवसेना' नावाबाबत निरपेक्ष निर्णय होईल, राहुल नार्वेकर यांचा विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2023 06:59 AM2023-01-22T06:59:11+5:302023-01-22T06:59:38+5:30
शिवसेना पक्षाच्या नावावरून विधीमंडळाचे अधिकार विधिमंडळ वापरेल, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. आपल्याकडे सक्षम निवडणूक आयोग आहे.
नवी मुंबई :
शिवसेना पक्षाच्या नावावरून विधीमंडळाचे अधिकार विधिमंडळ वापरेल, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. आपल्याकडे सक्षम निवडणूक आयोग आहे. त्यामुळे आयोग जोपर्यंत निर्णय घेत नाही, तोपर्यंत कोणतेही न्यायालय हस्तक्षेप करणार नाही, अशी भूमिका सर्वोच्च न्यायालयाने घेतली आहे. त्यामुळे आयोग काय निर्णय घेतो याची वाट पाहावी लागणार असल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शनिवारी नवी मुंबईत सांगितले आयोग निरपेक्षपणे काम करीत असतो. त्यामुळे सर्व कायद्यांचे पालन करून निर्णय घेतील, असा विश्वास नार्वेकर यांनी व्यक्त केला.
नवी मुंबई फेस्ट २०२३ च्या उद्घाटनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. महाराष्ट्र विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र लावावे, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील अधिवेशनात आपल्याकडे केली होती. त्यानुषंगाने बाळासाहेब यांच्या जयंतीच्या दिवशी ते लावण्याचा कार्यक्रम घेण्याची घोषणा त्याच अधिवेशनात केली होती.
नवी मुंबई शहर हे देशातील सर्वांत स्वच्छ आणि सुंदर शहर असून, नवी मुंबई फेस्टमुळे देशातील विविध राज्यातील संस्कृती, कला, क्रीडा, खाद्य, आदी नागरिकांना अनुभवता येणार असून, या फेस्टमध्ये नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी विठ्ठल मोरे, नेत्रा शिर्के, डॉ. योगेश दुबे, गजानन काळे, आर. के. महापात्रा आदी उपस्थित होते.