महाराष्ट्र भवनचे मे महिन्यात भूमिपूजन, अजित पवार यांची घोषणा
By योगेश पिंगळे | Published: March 1, 2024 07:22 PM2024-03-01T19:22:15+5:302024-03-01T19:22:34+5:30
आमदार म्हात्रे यांच्या पाठपुराव्यामुळे शहरातील महाराष्ट्र भवनाचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार असल्याने शहरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, आमदार म्हात्रे यांचे आभार व्यक्त केले.
नवी मुंबई : वाशी येथील आरक्षित भूखंडावर महाराष्ट्र भवन निर्माण व्हावे, यासाठी आमदार मंदा म्हात्रे यांनी सातत्याने पाठपुरावा केला असून, मे महिन्यात महाराष्ट्र भवनचे भूमिपूजन होणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री तथा राज्याचे वित्तमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी झालेल्या अंतिम अर्थसंकल्पातील चर्चेवरील उत्तरात विधानभवन येथे केली.
नवी मुंबई शहरात अनेक राज्यांची भवन आहेत. या ठिकाणी महाराष्ट्र भवनदेखील उभारण्यात यावे, यासाठी आमदार म्हात्रे आग्रही असून, त्यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले. सिडकोतर्फे यासंदर्भातला जो काय आराखडा आहे तो पूर्ण करण्यात येईल आणि मे महिन्यात कोड ऑफ कंडक्ट संपल्यानंतर मुख्यमंत्री आणि आम्हा सर्वांच्या हस्ते त्याचे भूमिपूजन करण्यात येणार असल्याची घोषणा पवार यांनी यावेळी केली.
आमदार म्हात्रे यांच्या पाठपुराव्यामुळे शहरातील महाराष्ट्र भवनाचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार असल्याने शहरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, आमदार म्हात्रे यांचे आभार व्यक्त केले.