'मेगाभरती' करणाऱ्या भाजपाला गळती; नगरसेवक घेताहेत अजितदादांच्या भेटीगाठी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2020 01:40 PM2020-02-13T13:40:09+5:302020-02-13T13:41:26+5:30
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षात खिंडार पडण्यास सुरुवात झाली आहे.
नवी मुंबई- महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षात खिंडार पडण्यास सुरुवात झाली आहे. गत आठवड्यात पाच नगरसेवकांनी शिवसेनेत जाणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. गुरुवारी सकाळी 8 वाजता तीन विद्यमान नगरसेविका व चार माजी नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
माजी मंत्री गणेश नाईक यांच्या सोबत भाजपामध्ये गेलेल्या नगरसेविका शुभांगी पाटील, शशिकला पाटील व सलूजा सुतार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यांच्या सोबत माजी नगरसेवक संदीप सुतार, राजू शिंदे, चंद्रकांत पाटील, विवेक पाटील ही उपस्थित होते. यामुळे भाजपला निवडणुकीपूर्वी मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीने कोपरखैरणेमधील एक विद्यमान नगरसेवक व माजी नगरसेविकाही लवकरच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिली.
मागील आठवड्यात तुर्भेमधील कट्टर नाईक समर्थक म्हणून आतापर्यंत ओळखल्या जाणा-या सुरेश कुलकर्णी यांनी पाच नगरसेवकांना घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. कुलकर्णी समर्थक नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट झाले असून हे सर्व नगरसेवक लवकरच नगरसेवक पदाचा राजीनामा देणार आहेत. विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री गणेश नाईक यांनी राष्ट्रवादीचे 48 नगरसेवक घेऊन भाजपामध्ये प्रवेश केला. ऐरोली व बेलापूर मतदारसंघाची उमेदवारी नाईक परिवारास मिळेल, अशी अपेक्षा होती. पण प्रत्यक्षात ऐरोली हा एकच मतदारसंघ त्यांच्यासाठी सोडण्यात आला. ऐरोलीचे आमदार संदीप नाईक यांची हॅट्ट्रीकची संधी हुकली. निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्याने भाजपामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. भाजपाचे अनेक नगरसेवक शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करू लागले आहेत.