महाराष्ट्र भवनाच्या वास्तुत अजित पवारांनी सुचविले बदल, विधिमंडळातील दालनात सादरीकरण

By नारायण जाधव | Published: July 4, 2024 03:27 PM2024-07-04T15:27:31+5:302024-07-04T15:28:03+5:30

या वास्तूची निविदा प्रक्रिया ही येत्या सोमवारपर्यंत सुरू होणार असून लवकरच महाराष्ट्र भवनाचे भूमिपूजन होऊन बांधकामाला सुरुवात होणार आहे.

Changes suggested by Ajit Pawar in the architecture of Maharashtra Bhavan, presentation in the Legislative Hall | महाराष्ट्र भवनाच्या वास्तुत अजित पवारांनी सुचविले बदल, विधिमंडळातील दालनात सादरीकरण

महाराष्ट्र भवनाच्या वास्तुत अजित पवारांनी सुचविले बदल, विधिमंडळातील दालनात सादरीकरण

नवी मुंबई :नवी मुंबईतील वाशी रेल्वेस्थानकासमोर बांधण्यात येणाऱ्या महाराष्ट्र भवन प्रकल्पाचे गुरुवारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मुंबई येथील विधिमंडळातील दालनात अंतरिम सादरीकरण करण्यात आले.

यावेळी आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या समवेत सिडको व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, सहव्यवस्थापकीय संचालक (१) शंतनू गोयल, मुख्य कार्यकारी अभियंता शीला करुणाकर, अधीक्षक अभियंता अर्जुन अनोसे, वास्तुविशारद हितेन शेट्टी, अभियंत्या तेजस्विनी पंडित व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.
या वास्तूची निविदा प्रक्रिया ही येत्या सोमवारपर्यंत सुरू होणार असून लवकरच महाराष्ट्र भवनाचे भूमिपूजन होऊन बांधकामाला सुरुवात होणार आहे.

यावेळी पवार यांनी महाराष्ट्र भवन संकल्पित चित्रामध्ये काही किंचित फेरबदल करून लवकरात लवकर भव्य-दिव्य असे महाराष्ट्र भवनाची निविदा प्रक्रिया पूर्ण करून तातडीने भूमिपूजन करून बांधकामाला सुरुवात करावी, असे आदेश सिडको व्यवस्थापकीय संचालक विजय सिंगल व संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

या सुविधा असणार महाराष्ट्र भवनात

महाराष्ट्र भवनाची अशी सुंदर प्रतिकृती बघितल्यावर खरेच देशात अशी वास्तू उभारण्यात आल्याबद्दल आनंद व्यक्त केला. ही वास्तू १२ मजल्यांची असून, यामध्ये शयनगृहाच्या ११ खोल्या, अतिथीगृह दुहेरी शेअरिंगच्या ७२, अतिथीगृह डबल बेडच्या ६८ तसेच एक्झिक्युटिव्ह १० अशा एकूण १६१ खाेल्या असणार आहेत. तसेच लोकप्रतिनिधी सोबत येणारे त्यांचे वाहनचालक किंवा कर्मचाऱ्यांकरिताही खोल्या असणार आहेत. त्याचबरोबर ई लायब्ररी, कॉन्फरन्स हॉल, मिटिंग रूम, फूड प्लाझा, दुचाकी व चारचाकी वाहनतळ अशा अनेक विविध प्रकारच्या सर्व सुविधा या महाराष्ट्र भवनामध्ये पहावयास मिळणार आहेत.

प्रथमदर्शनी भागात शिवाजी महाराजांचा बैठी पुतळा

महाराष्ट्र भवनाचे प्रथमदर्शनी भागामध्ये महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा बैठी पुतळा असणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेने भवनामध्ये प्रवेश करताच छत्रपती शिवाजी महाराज होऊन त्यानंतरच महाराष्ट्राची आठवण होणार आहे.

मंदा म्हात्रेंचा पाठपुरावा

आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले की, ज्या महाराष्ट्र भवनासाठी २०१४ पासूनच्या लढ्याला आता पूर्णविराम लागला असून या वास्तूचा फायदा हा नवी मुंबईलाच नव्हे पूर्ण महाराष्ट्र राज्याला होणार असल्याचे सांगितले. महाराष्ट्र भवनाचा प्रश्न हा लवकरात लवकर मार्गी लावल्याबद्दल त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार तसेच सिडको व्यवस्थापकीय संचालकांचे आभार मानले आहेत.

Web Title: Changes suggested by Ajit Pawar in the architecture of Maharashtra Bhavan, presentation in the Legislative Hall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.