गणेशोत्सवानिमित्त नागरिकांची खरेदीसाठी गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2018 02:29 AM2018-09-09T02:29:39+5:302018-09-09T02:29:55+5:30
पनवेल व नवी मुंबई परिसरामध्ये गणेशोत्सवानिमित्त खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे.
नवी मुंबई : पनवेल व नवी मुंबई परिसरामध्ये गणेशोत्सवानिमित्त खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनीही मंडपाचे काम पूर्ण करण्यासाठी धावपळ सुरू केली आहे. खरेदीसोबत देखाव्यांचे नियोजनही अंतिम टप्प्यात आले आहे.
नवी मुंबई व पनवेल परिसरामध्ये २५ हजारपेक्षा जास्त घरांमध्ये व ५०० पेक्षा जास्त सार्वजनिक गणेशोत्सव असणार आहेत. शनिवारी अनेक नागरिकांना सुट्टी असल्यामुळे खरेदीसाठी मार्केटमध्ये गर्दी करण्यास सुरवात केली होती. नवी मुंबईमध्ये शिरवणे, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माथाडी भवन परिसर, वाशी सेक्टर ९ ते १५, नेरूळ सेक्टर ८ ते १०, सीवूड, बेलापूर व ऐरोलीमधील मार्केटमध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. प्लॅस्टिक व थर्माकोलवर बंदी केल्यामुळे यावर्षी थर्माकोलचे मखर दिसत नाही. रोषणाईसाठी चायनाच्या विद्युतमाळांना पसंती दिली जात आहे.
पनवेल परिसरामध्येही नागरिकांनी मार्केटमध्ये खरेदीसाठी गर्दी करण्यास सुरवात केली आहे. गणेशोत्सव मंडळांनीही मंडप उभारण्याचे काम वेगाने सुरू केले असल्याचे पाहावयास मिळत आहे.
महामार्गाची दुरुस्ती वेगाने
मुंबई-गोवा महामार्गावरून गणेशोत्सवासाठी लाखो भाविक कोकणात जात असतात. गणेशभक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही या रोडची पाहणी केली. यानंतर खड्डे व इतर दुरुस्तीच्या कामांना वेग आला आहे. दोन दिवसांमध्ये सर्व कामे पूर्ण करण्यात येणार आहेत.