महाविकास आघाडीचं नवीन मिशन ठरलं; उद्या पहिला महामेळावा होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2020 05:02 PM2020-02-03T17:02:46+5:302020-02-03T17:22:09+5:30
महाविकास आघाडीचा पहिला मेळावा उद्या; महत्त्वाच्या नेत्यांची उपस्थिती
नवी मुंबई: विधानसभा निवडणुकीनंतर भाजपाला सत्तेपासून दूर राखण्यात यश मिळवणारी महाविकास आघाडी आता नवी मुंबई महापालिका निवडणुकीतही एकत्र लढणार आहे. सध्या नवी मुंबईत भाजपाची सत्ता आहे. राज्य सरकारपाठोपाठ नवी मुंबईतही भाजपाला धक्का देण्यासाठी महाविकास आघाडीनं कंबर कसली आहे. उद्या शहरात महाविकास आघाडीचा पहिला मेळावा होणार असून त्याला तिन्ही पक्षांचे महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत मोठ्या राजकीय हालचाली घडल्या होत्या. राष्ट्रवादीच्या तब्बल ४८ नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला. त्यामुळे पालिकेत भाजपाची सत्ता आली. आता भाजपाला पराभूत करण्यासाठी महाविकास आघाडीनं जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्याचाच भाग म्हणून उद्या महाविकास आघाडीचा पहिला मेळावा शहरात होणार आहे. या मोर्चाला शिवसेनेकडून एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीकडून अजित पवार, जयंत पाटील आणि काँग्रेसकडून अशोक चव्हाण, विश्वजीत कदम उपस्थित राहतील. भाजपाला पराभूत करण्यासाठी महाविकास आघाडीनं जोरदार तयारी सुरू केल्यानं सत्ताधाऱ्यांसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे.
विधानसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते गणेश नाईक यांनी मुलगा संदीपसह भाजपामध्ये प्रवेश केला. ऐरोली मतदारसंघातून निवडणूक लढवून ते आमदारही झाले. २०१५ मध्ये अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही गणेश नाईक यांनी महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता राखली होती. विधानसभा निवडणुकीआधी भाजपावासी झालेल्या नाईक यांना आता महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीचा सामना करावा लागेल. त्यामुळे त्यांच्यासमोर पुन्हा एकदा मोठं आव्हान असेल.