महाविकास आघाडीसमोर तिढा जागावाटपाचा; नवी मुंबईतील कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2021 12:49 AM2021-02-10T00:49:55+5:302021-02-10T00:51:33+5:30
आघाडीत जादा जागा मिळविण्यासाठी तिन्ही पक्षांचे प्रयत्न
- नामदेव मोरे
नवी मुंबई : महाविकास आघाडीच्या तीनही घटक पक्षांमध्ये जास्तीतजास्त जागा मिळविण्यासाठी स्पर्धा सुरू झाली आहे. जवळपास ११ जागांवर सर्वच घटक पक्षांनी दावा केला असून जागावाटपाचा तिढा सोडविण्यासाठी नेत्यांना कसरत करावी लागणार आहे. इतरही अनेक प्रभागांमध्ये मतभेद असून जागावाटप योग्य पद्धतीने झाले नाही, तर बंडखाेरी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये सत्तांतर घडविण्यासाठी महाविकास आघाडीने तयारी सुरू केली आहे. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शहरात सभा व कार्यक्रमांचा धडाका लावला आहे. परंतु अनेक ठिकाणी एकाच प्रभागामध्ये शिवसेना व राष्ट्रवादीचे व काही ठिकाणी शिवसेना व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये स्पर्धा आहे. याशिवाय भाजपमधून आघाडीमध्ये येणारांची संख्याही वाढत आहे. दिघामध्ये नीवन गवते यांनी भाजप सोडून शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. याच परिसरात राष्ट्रवादीने अन्नू आंग्रे यांना ताकद दिली आहे. शनिवारी झालेल्या कार्यक्रमात गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी गवते यांच्यावरही टीका केली होती. येथील प्रभाग ३ व ९ मध्ये तिकीटवाटपामध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. कोपरखैरणेमध्ये माथाडी वसाहत असल्यामुळे तेथे राष्ट्रवादी काँग्रेसने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्या ठिकाणीही काही जागांवर मतभेद होण्याची शक्यता आहे. सानपाडा प्रभाग ७६ मध्ये राष्ट्रवादीच्या नगरसेविका आहेत. परंतु याच ठिकाणी शिवसेनेनेही दावा केला आहे. सीवूड, जुईनगर व इतर काही ठिकाणीही चुरस निर्माण झाली आहे.
भाजपमधून शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजून अनेक नगरसेवक प्रवेश करणार आहेत. त्यांचे पुनर्वसन करण्याचे आव्हानही आघाडीच्या नेत्यांसमोर असणार आहे. काँग्रेसनेही जादा जागांची मागणी केली आहे. निवडणुकीपूर्वीच शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. काहींनी अपक्ष तर काहींनी पक्षांतर करण्याची तयारी सुरू केली आहे. यामुळे आघाडी करताना जागावाटपाचे व जागावाटप झाल्यानंतर बंडखोरी रोखण्याचे आव्हान आघाडीच्या नेत्यांसमोर असणार आहे.