Vidhan Sabha 2019: माथाडी मेळाव्यात युतीच्या प्रचाराचे रणशिंग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 12:35 AM2019-09-25T00:35:30+5:302019-09-25T00:35:57+5:30

एपीएमसीमध्ये होणार मेळावा; मुख्यमंत्री - उद्धव ठाकरे उपस्थित राहणार; जयंती सोहळ्यास प्रथमच राष्ट्रवादीचे नेते नसणार

Maharashtra Vidhan Sabha 2019 The trumpet of the propaganda of the Alliance in Mathadi fair! | Vidhan Sabha 2019: माथाडी मेळाव्यात युतीच्या प्रचाराचे रणशिंग!

Vidhan Sabha 2019: माथाडी मेळाव्यात युतीच्या प्रचाराचे रणशिंग!

Next

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी माथाडी कामगारांचा मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याच्या माध्यमातून युतीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले जाणार असल्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे.

महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या वतीने प्रत्येक वर्षी २५ सप्टेंबरला कामगारांचा मेळावा आयोजित केला जातो. संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या या कार्यक्रमास प्रत्येक वर्षी राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार यांच्यासह पक्षाचे अनेक नेते उपस्थित राहत असतात. लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याला विशेष महत्त्व प्राप्त होत असते. यापूर्वी काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीच्या प्रचाराचा नारळ या मेळाव्यातून फुटला जात होता. नवी मुंबई, पनवेल, सातारा, वाई, कोरेगाव, भोर, शिराळा या विधानसभा मतदारसंघामध्ये माथाडी कामगारांची मते निर्णायक आहेत. याशिवाय नाशिक, पुणे जिल्ह्यातही कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे मेळाव्यातून मतदारांना आवाहन केले जाते. या वर्षी प्रथमच मेळाव्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व इतरांना आमंत्रण देण्यात आलेले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व इतर नेतेच उपस्थित राहणार आहेत. शिवसेना व भाजपचे दोन्ही प्रमुख नेते उपस्थित राहणार असल्यामुळे या मेळाव्यातून युतीच्या प्रचाराचा नारळ फुटला जाणार असल्याचे बोलले जात आहे. मेळाव्याची जय्यत तयारी सुरू आहे. कांदा-बटाटा मार्केटचे लिलावगृह व त्याच्या बाहेरही मंडप टाकला जाणार असून, शक्तिप्रदर्शन केले जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

महाराष्ट्र राज्य माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार अधिनियम १९६९ या कायद्याला ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. माथाडी पतसंस्थेलाही ५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे या वर्षी मेळावा मोठ्या प्रमाणात आयोजित केला जात असल्याचे सांगितले जात आहे. परंतु प्रत्यक्षात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शक्तिप्रदर्शनाचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे. या मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नक्की काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. युतीविषयी काय बोलणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. कामगारांमध्येही या मेळाव्याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. माथाडी संघटना आतापर्यंत राष्ट्रवादीसोबत राहिली होती. निवडणुकांमध्येही राष्ट्रवादीला पाठिंबा दिला जात होता. संघटनेचे कार्याध्यक्ष शशिकांत शिंदे राष्ट्रवादीच्या तिकिटावर चार वेळा विधानसभा निवडणुकीमध्ये विजयी झाले आहेत. यामुळे आता या वेळी मेळाव्यातून काय बोलणार याविषयी उत्सुकता लागून राहिली आहे.

आमंत्रितांमध्येही युतीचेच नेते : माथाडी कामगारांच्या मेळाव्यामध्ये वाईचे आमदार मकरंद पाटील वगळता सर्व शिवसेना व भाजपचेच पदाधिकारी असणार आहेत. सातारा, ठाणे व नवी मुंबईमधील युतीच्या नेत्यांची व मंत्र्यांची नावे आमंत्रितांमध्ये असल्यामुळे माथाडी मेळाव्याला युतीच्या सभेचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

उदयनराजेंचीही उत्सुकता : सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवणूक जाहीर झाली आहे. यापूर्वी झालेल्या निवडणुकीमध्ये माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याविरोधात निवडणूक लढविली होती. उदयनराजे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे बुधवारी होणाºया मेळाव्याला ते उपस्थित राहणार का? याविषयी बाजार समितीमध्ये चर्चा सुरू झाली आहे.

मेळाव्यात माथाडी नेते काय बोलणार..?
माथाडी मेळाव्याला पहिल्यांदा राष्ट्रवादीचे पहिल्या फळीतील नेते उपस्थित राहणार नाहीत. यामुळे संघटनेचे कार्याध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे मेळाव्यामध्ये नक्की काय भूमिका मांडणार? कामगारांना माथाडी कामगारांच्या मागे उभे राहण्याचे आवाहन करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. संघटनेचे सरचिटणीस नरेंद्र पाटील यांची भूमिका महत्त्वाची राहणार असून ते युतीच्या मागे उभे राहण्याचे आवाहन करणार की काय बोलणार याविषयी उत्सुकता लागली आहे.

Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 The trumpet of the propaganda of the Alliance in Mathadi fair!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.