विशाल अटल सेतू देशाला मिळाला, हेच आमच्या संकल्पाचे यश : पंतप्रधान नरेंद्र मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2024 05:30 AM2024-01-13T05:30:41+5:302024-01-13T05:31:33+5:30
एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचे केलं कौतुक
नारायण जाधव/वैभव गायकर
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: आज देशातील सर्वांत मोठा विशाल अटल सेतू देशाला मिळाला, हे आमच्या संकल्पाचे यश आहे. भारताच्या विकासासाठी आम्ही सागराशीही मुकाबला करू शकतो. लाटांविरोधात लढू शकतो, असे प्रतिपादन पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जागेवर आयोजित जाहीर सभेत केले.
मी २४ डिसेंबर, २०१६ चा दिवस विसरू शकत नाही. या दिवशी अटल सेतूच्या भूमिपूजनासाठी आलो होतो, तेव्हा मी छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करून म्हटले होते की लिहून ठेवा, देश बदलेलही आणि देश पुढेही जाईल. आज या सेतूच्या शुभारंभानंतर ते तुम्हाला दिसत आहे. छत्रपती शिवाजी महाराज, मुंबादेवी, सिद्धिविनायक यांचे स्मरण करून मी अटल सेतू देशाला अर्पण करीत आहे. कोरोनासारख्या संकटावर मात करून अटल सेतूची उभारणी केली आहे, असेही ते म्हणाले.
मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सेतूसह कोस्टल रोड, ऑरेंट गेट ते मरिन ड्राइव्ह बोगदा, सूर्या पाणीपुरवठा योजना, दिघा रेल्वे स्थानक, खारकोपर ते उरण लोकल मार्ग आणि खार ते गोरेगाव रेल्वे मार्ग अशा ३०,५०० कोटींच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी व लोकार्पण पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी केले. महाराष्ट्राच्या महिला सशक्तीकरण अभियानाचा प्रारंभ माेदी यांनी केला.
२० वर्षे सत्ता उपभोगली, कामे केली नाहीत
पूर्वी कोट्यवधींचे मेगा स्कॅम व्हायचे. विकास प्रकल्पांचे काम कूर्म गतीने चालायचे; परंतु आमच्या काळात सेला टनेल, अटल टनेल, फ्रेट कॉरिडॉर, वंदे भारत, नव भारत, अमृत भारत, विमानतळांचे काम, समृद्धीसारख्या महामार्गांचे काम वेळेत पूर्ण हाेत आहे. औरंगाबादची ऑरिक सिटी, शेंद्रा बिडकीन हे मेगा प्रोजेक्ट त्याची उदाहरणे आहेत. येथे पूर्वीच्या सरकारने निळवंडे धरणाचे काम २० वर्षे सत्ता उपभोगली तरी पूर्ण केले नाही. आम्ही ते तत्काळ पूर्ण केले, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील तत्कालीन आघाडी सरकारांवरही टीका केली.
एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचे कौतुक
आजचा दिवस मुंबई, महाराष्ट्रासह विकसित भारतासाठी महत्त्वाचा आहे. देशाचा विकास होणार, ही मोदींची गॅरंटी आहे. ३३ हजार कोटींच्या कामाचे लोकार्पण केले. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचा विकास सुरू आहे, असे सांगून पंतप्रधानांनी तिघांचे कौतुक केले.
पायाभूत सुविधांसाठी २००४ साली पूर्वीच्या सरकारने १२ लाख कोटी खर्च केले. आता आम्ही ४४ लाख कोटी रुपये खर्च करीत आहोत. त्यातील ८ लाख कोटी रुपये राज्यात खर्च
करीत असल्याचे माेदी म्हणाले.
कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, राज्यपाल रमेश बैस, मंत्री छगन भुजबळ, अदिती तटकरे, एमएमआरडीएचे आयुक्त संजय मुखर्जी, जपान सरकारचे राजदूत सुझुकी उपस्थित होते.