प्रत्येक उद्योग गुजरातला कसा नेता येईल,यासाठीच पंतप्रधान प्रयत्नशील - शरद पवार
By वैभव गायकर | Published: December 16, 2023 09:37 PM2023-12-16T21:37:35+5:302023-12-16T21:39:25+5:30
"पनवेल परिसरात अनेक प्रश्न आहेत. माथाडी कामगारांना घरे तर मिळाली मात्र या घरांची अवस्था अत्यंत दयनीय असल्याचे पवार म्हणाले. पनवेल परिसरात प्रकल्पग्रस्तांना अनेक प्रश्न भेडसावत आहेत. नैना सारख्या प्रकल्पाला विरोध का होत आहे? याबाबत जाणुन घेतले पाहिजे."
पनवेल : ज्यांच्या हातात देशाची सत्ता दिली ते देशाचा विचार करत नाहीत. देशातील प्रत्येक उद्योग सुरतला कसा नेता येईल. यासाठीच पंतप्रधान प्रयत्नशील असल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी दि.16 रोजी पनवेलमध्ये राष्ट्रवादी कॉग्रेसच्या स्वाभिमान मेळाव्यात केली.मुंबई मधील सर्वात मोठा हिऱ्यांचा व्यापार सुरतला नेऊन पंतप्रधान त्याठिकाणी उदघाटन जातात अशी टीका शरद पवार यांनी केली.
पनवेल परिसरात अनेक प्रश्न आहेत. माथाडी कामगारांना घरे तर मिळाली मात्र या घरांची अवस्था अत्यंत दयनीय असल्याचे पवार म्हणाले. पनवेल परिसरात प्रकल्पग्रस्तांना अनेक प्रश्न भेडसावत आहेत. नैना सारख्या प्रकल्पाला विरोध का होत आहे? याबाबत जाणुन घेतले पाहिजे. विकासाला आणि प्रकल्पाला कोणीही विरोध करीत नसतो मात्र हे प्रकल्प स्थानिकांना उध्वस्त करणारे नको असे शरद पवार म्हणाले. दहा दिवसात अधिवेशनात संपुष्ठात आल्यावर मी स्वतः पुढाकार घेत नैना बाबत शेतकऱ्यांची भूमिका शासन स्तरावर मांडणार असल्याची ग्वाही शरद पवार यांनी दिली.
यावेळी, राष्ट्रवादिचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपवर टीका केली.भाजपला पवारांची भीती वाटते. म्हणून फडणवीस त्यांच्या पक्षाच्या मेळाव्यात शरद पवारांवर बोलतात.भाजपचा रथ केवळ शरद पवार थांबवू शकतात. त्यामुळे ते शरद पवारांवर वारंवार टीका करतात. शरद पवारांच्या नावाने खोटी माहिती महाराष्ट्रभर पसरवली जात असल्याची टीका जयंत पाटील यांनी केली.
खासदार कोल्हे यांनी राष्ट्रवादीच्या बंडखोरांवर टीका करत लग्न जमवताना जसे मुला मुलींची पत्रिका पाहिली जाते. तसेच मते देताना मतदारांनी उमेदवारांच्या पत्रिका बघाव्यात. कोणाच्या पत्रिकेत ईडी, सीबीआय आहे का? हे तपासण्याची वेळ आली असल्याची टिका खासदार अमोल कोल्हे यांनी केली.