Russia-Ukraine Conflict: पनवेलचे ८ विद्यार्थी परतीच्या प्रतीक्षेत; मायदेशात परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2022 06:23 AM2022-02-27T06:23:29+5:302022-02-27T06:24:03+5:30
प्रत्येक देश युक्रेनमध्ये अडकलेल्या नागरिकांना आपल्या देशात सुखरूप आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
वैभव गायकर, लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : रशिया-युक्रेन युद्धाचा भडका उडाला आहे. प्रत्येक देश युक्रेनमध्ये अडकलेल्या नागरिकांना आपल्या देशात सुखरूप आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. भारतातील शेकडो विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकल्याने त्यांना परत आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. पनवेल तालुक्यातील आठ विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश आहे.
वैद्यकीय शिक्षणासाठी हे विद्यार्थी युक्रेनला गेले होते. जिल्हा प्रशासनाला या विद्यार्थ्यांची माहिती मिळाली आहे. विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांच्या नातेवाइकांची यादी जिल्हा प्रशासनाने सार्वजनिक केली आहे. एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यामध्ये साहिल अनंता मामूनकर (लाडीवली), समीक्षा रंजीत क्षीरसाठ (खारघर), अद्वैत कैलास गाडे (पनवेल), श्रेयस टिळे (पनवेल), रुषवंती भोगले (पनवेल), कुंजल मंगेश कुवेसकर (पनवेल), शिल्पिता बोरे (पनवेल), प्रचिती दीपक पवार (करंजाडे ) या विद्यार्थ्यांसह रायगड जिल्ह्यातील एकूण ३० विद्यार्थ्यांचा समावेश आहे. भारतीय नागरिकांना युक्रेनमधून मायदेशी परत आणण्यासाठी एअर इंडियाचे एआय-१९४४ हे पहिले विमान २१९ नागरिकांना घेऊन बुखारेस्टहून (रोमानिया) मुंबईकडे रवाना झाले आहे.
परराष्ट्र मंत्रालय या विद्यार्थ्यांच्या थेट संपर्कात आहे. जिल्हा प्रशासन अथवा राज्य शासनाचा या विद्यार्थ्यांशी थेट संपर्क नाही. जे विद्यार्थी आमच्या संपर्कात आले आहेत, त्यांची यादी आम्ही प्रसिद्ध केली आहे. विद्यार्थ्यांची संख्या वाढण्याची देखील शक्यता आहे. - पद्मश्री बैनाडे, निवासी उपजिल्हाधिकारी, रायगड