बाप्पाच्या स्वागताची जय्यत तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 03:17 AM2018-09-13T03:17:50+5:302018-09-13T03:18:04+5:30

लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी शहरवासीय सज्ज झाले आहेत.

Welcome to Bappa's Welcome | बाप्पाच्या स्वागताची जय्यत तयारी

बाप्पाच्या स्वागताची जय्यत तयारी

Next

नवी मुंबई, पनवेल : लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी शहरवासीय सज्ज झाले आहेत. गुरुवारी सकाळी बाप्पाचे धूमधडाक्यात आगमन होईल. त्या दृष्टीने गणेशभक्तांची लगबग सुरू झाली आहे. तयारीसाठी बुधवारचा अखेरचा दिवस असल्याने शहरातील बाजारपेठा हाउसफुल्ल झाल्या होत्या. दरम्यान, यावर्षी नवी मुंबईसह पनवेल विभागात ६१० सार्वजनिक, तर सुमारे ७० हजार घरगुती गणेशस्थापना होणार आहे. त्या दृष्टीने दोन्ही विभागांतील प्रशासकीय आणि पोलीस यंत्रणा कामाला लागल्या आहेत.
बुधवारी सकाळपासून वाशीच्या एपीएमसीच्या घाऊक बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी उसळली होती. सजावटीसाठीच्या साहित्यापासून प्रसादाची मिठाई, गणरायाचे अलंकार, रोषणाई आदीच्या खरेदीसाठी एकच झुंबड उडाल्याचे दिसून आले. खरेदीसाठी नवी मुंबईसह पनवेल, मुंबई व ठाणे येथून ग्राहक आल्याने एपीएमसी परिसरात वाहतुकीची समस्या निर्माण झाली होती. एपीएमसीबरोबरच शहराच्या विविध भागांतील लहान-लहान बाजारपेठा ग्राहकांनी फुलून गेल्या होत्या. अनेक ठिकाणी विक्रेत्यांनी पदपथच बळकावल्याने रहदारीला अडथळा निर्माण होत होता. वाशी, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली, नेरुळ, बेलापूर सीबीडी या परिसरातील दुकानांत ग्राहकांची एकच गर्दी झाल्याचे दिसून आले. नवी मुंबईप्रमाणेच पनवेल परिसरातही शेवटच्या दिवशी ग्राहकांनी खरेदीवर भर दिला होता, त्यामुळे येथील प्रमुख बाजारपेठा हाउसफुल्ल झाल्या होत्या. सकाळपासूनच ग्राहकांची रीघ लागल्याने त्याचा वाहतुकीवर परिणाम झाल्याचे दिसून आले. सार्वजनिक तसेच घरगुती बाप्पाच्या मूर्तींचे बुधवारी सकाळपासूनच ढोल-ताशांच्या गजरात आगमन झाले.
नवी मुंबई विभागात ३७५ ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सवाची नोंद आहे, तर तब्बल ३०,१५२ घरगुती गणपती आहेत. तसेच पनवेल विभागात २३५ सार्वजनिक, तर ३९ हजार ७०० घरगुती गणपतीची नोंद केली आहे. उत्सव निर्विघ्नपणे पार पडावा, यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. ठिकठिकाणी सुमारे ७०० पोलीस तैनात करण्यात आले आहेत. त्यांच्या दिमतीला जवळपास १५० अधिकारी असणार आहेत.
>रंगीबेरंगी सजावटीचे साहित्य
बाजारपेठेत दुकानांबाहेर पूजा साहित्य, प्लॅस्टिक आणि थर्माकोलबंदीमुळे यंदा इकोफ्रेंडली सजावट म्हणून रंगीबेरंगी अस्सल फुलांच्या आणि कागदी फुलांची रेडिमेड मखर, नानाविध रंगीत विद्युत रोषणाईची तोरणे, कापडावर सुंदर नक्षीकाम केलेली तोरणे, कंठमाला, सजावटीची फुले खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी झाली होती.
>विसर्जन तलावांची पाहणी : महापालिकेने गणेशोत्सवासाठी जोरदार तयारी केली आहे. विसर्जनासाठी शहराच्या विविध भागांत २३ तलाव आहेत. त्यापैकी १४ तलावांत इटालियन गॅबियन वॉल तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आला आहे. श्रीमूर्तींच्या विसर्जनासाठी विसर्जनस्थळावर ७०० स्वयंसेवक तैनात केले जाणार आहेत. महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी बुधवारी या विसर्जन तलावांची पाहणी केली. पनवेल विभागातही महापालिकेने जय्यत तयारी केली आहे. एकूणच या वेळी गणेशोत्सव मंडळांना पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले.

Web Title: Welcome to Bappa's Welcome

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.