ठाणे लोकसभेवर युवक काँग्रेसचा दावा, शिवसेना ठाकरे गटाला बसणार धक्का; भिवंडीतील कोकण विभागीय बैठकीत चर्चा
By नारायण जाधव | Published: January 25, 2024 03:13 PM2024-01-25T15:13:55+5:302024-01-25T15:15:08+5:30
ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून येथे उद्धव ठाकरे गटाचे राजन विचारे हे विद्यमान खासदार आहेत.
नवी मुंबई : शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे लोकसभा मतदारसंघावर येत्या निवडणुकीत इंडिया आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेसने दावा ठोकला आहे. काँग्रेस पक्षाच्या भिवंडीत मंगळवारी झालेल्या बैठकीत युवक काँग्रेसने ठाणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचे संकेत दिले आहेत. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अनिकेत म्हात्रे यांनी आपण ठाण्यातून इच्छुक असल्याचे पत्र काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथल्ला आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांना दिले आहे.
ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून येथे उद्धव ठाकरे गटाचे राजन विचारे हे विद्यमान खासदार आहेत. हॅटट्रिक पूर्ण केलेले विद्यमान खासदार विचारे यांची दावेदारी मजबूत असताना येथून युवक काँग्रेसने दावा ठोकल्याने हा इंडिया आघाडीतील ठाकरे गटाला धक्का दिल्याचे मानले जात आहे
काँग्रेस पक्षाकडून राज्यात विभागनिहाय बैठका सुरू असून त्यात कार्यकर्त्यांची मते अजमावून घेण्यात येत आहेत. आतापर्यंत विदर्भ, पुणे विभागाच्या बैठका पार पडल्या आहेत. मंगळवारी कोकण विभागाची बैठक भिवंडीत पार पडली. तीत रमेश चेन्निथला यांच्यासह नाना पटोले, विजय वडेट्टीवार आणि इतर वरिष्ठ नेत्यांना भेटून आपण ठाण्यातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे पत्र अनिकेत म्हात्रे यांनी दिले आहे. त्यांच्या मागणीस नवी मुंबई जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अनिल कौशिक, ओबीसी सेलचे अध्यक्ष अंकुश सोनवणे यांच्यासह इतर आघाड्यांचा पाठिंबा आहे.
काय म्हटले आहे म्हात्रेंनी पत्रात
गेल्या दोन-तीन दशकांतील राजकीय परिस्थितीचा विचार करता, हे स्पष्ट होते की १९९० च्या दशकात ठाण्यात काँग्रेसचे लक्षणीय अस्तित्व आणि एकनिष्ठ मतदारांचा आधार होता. मात्र, गेल्या काही वर्षांत ठाणे लोकसभेची जागा काँग्रेसने मित्रपक्षांना देण्याचा निर्णय घेतल्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांची नकळत निराशा झाली आहे. यामुळे दुर्दैवाने ठाण्यामधील काँग्रेसचा प्रभाव आणि प्रतिनिधित्व कमकुवत झाले आहे. या पार्श्वभूमीवर, पक्षाच्या रणनीतीचे पूनर्मूल्यांकन करावे, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे. या पत्राची प्रत उपरोक्त नेत्यांसह अखिल भारतीय युवक काँग्रेसचे प्रभारी कृष्ण अल्वरू, अखिल भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष बी.व्ही. श्रीनिवास यांनाही दिली आहे.
गेल्या १२ वर्षांपासून संघटनेमध्ये काँग्रेससाठी निष्ठेने काम करत असून, पक्षाने सोपवलेल्या सर्व जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडल्या आहेत. ‘काही तरी कर नवी मुंबईकर’ या लोकचळवळीच्या माध्यमातून नवी मुंबईतील सामान्य जनतेची मोठी ताकद उभी केली असून, ती संपूर्ण ठाणे जिल्ह्यात काँग्रेस पसरवू शकते, असा विश्वास आहे.
- अनिकेत म्हात्रे, उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस