Gautam Adani: सातत्याने टीका करणाऱ्या राहुल गांधींबद्दल पहिल्यांदाच बोलले गौतम अदानी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2023 12:51 PM2023-01-12T12:51:24+5:302023-01-12T12:59:12+5:30

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडून सातत्याने टीका होत असल्यासंदर्भात अदानी यांना विचारण्यात आलं, त्यावरही त्यांनी स्पष्टपणे उत्तर दिलं.

“ज्या गोष्टी आपल्या हातात नसतात त्यावर अधिक चिंता करण्याची गरज नसते. याच सिद्धांतावर आपण काम करतो,” असं वक्तव्य आशियातील सर्वात श्रीमंत उद्योजक गौतम अदानी यांनी केलं. गौतम अदानी हे अनेक कठीण परिस्थितीतून पुढे आले आहेत.

अगदी स्कुटरपासून सुरु झालेला त्यांचा बिझनेस प्रवास हा आज प्रायव्हेट जेटपर्यंत पोहोचला असून केवळ मेहनत, मेहनत आणि मेहनत... हेच आपल्या यशाचं गमक असल्याचं त्यांनी म्हटलं. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडून सातत्याने टीका होत असल्यासंदर्भात अदानी यांना विचारण्यात आलं, त्यावरही त्यांनी स्पष्टपणे उत्तर दिलं.

इंडिया टीव्हीशी साधलेल्या संवादादरम्यान गौतम अदानी यांनी आपली जीवनकहानीच संक्षिप्तपणे सांगितली. “जीवनात आतापर्यंत दोन वेळा मृत्यूला जवळून पाहिलं आहे.

वाईट वेळ विसरून जाणंच चांगलं आहे. मी प्रत्येक परिस्थितीत जुळवून घेण्याचा प्रयत्न करतो. ज्या दिवशी अपहरण झालं होतं, त्याच्या दुसऱ्या दिवशी मला सोडण्यात आलं. ज्या रात्री माझं अपहरण झालं होतं, त्या रात्रीही मी शांततेनं झोपलो होतो.

कारण ज्या गोष्टी आपल्या हाती नाही, त्यावर विचार करून काही फायदा नाही,” असं अदानी म्हणाले. अदानी यांनी आपल्या कौटुंबिक जीवनाविषयी माहिती मी वयाच्या १९ वर्षी मुंबईत आलो, ४ वर्षे मुंबईत राहिलो,

त्या मुंबईने मला भरपूर शिकवलं, असं ते म्हणाले. त्यानंतर, मी अहमदाबादला गेलो आणि तेथूनच बिझनेस वाढवण्यास सुरुवात केली, अशी कहानी त्यांनी सांगितली.

राहुल गांधी मोदी सरकारला लक्ष्य करताना नेहमीच दोन उद्योगपतींचं नाव घेतात. त्यामध्ये, गौतम अदानी यांचा उल्लेख ते करतात. मोदी सरकार उद्योपतींच सरकार असून गौतम अदानी आणि अंबानी यांना मोठमोठी टेंडर दिली जातात, असा आरोप राहुल गांधी करतात. यासंदर्भात अदानी यांना प्रश्न विचारला असता, पहिल्यांदाच ते अदानी यांच्याबद्दल बोलले आहेत.

राहुल गांधी हे देशातील आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेता आहेत. त्यांचा मी सन्मान करतो, ते माझ्याबद्दल जे काही बोलले असतील ते केवळ राजकीय टीका-टिपण्णी यापलिकडे मी त्याकडे पाहत नाही, असे अदानी यांनी म्हटले.

मी राहुल गांधींचा सन्मान करतो, कारण तेही देशाच्या प्रगतीचाच विचार करतात, असे अदानी यांनी म्हटले. एक उद्योजक म्हणून राहुल गांधींच्या राजकीय विधानावर मत मांडणं मी योग्य समजत नाही, असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

अदानी ग्रुप किंवा आमच्या कंपनीला सरकारकडून कुठलीही विशेष सवलत दिली जात नाही. जे नियमाप्रमाणे आहे तेच आम्ही करतो. नियमानुसार प्रक्रियांचे पालन केल्यानंतरच सरकारी कामे आम्हाला मिळतात, असेही अदानी यांनी यावेळी स्पष्ट केले.