भारतातील अधिकाऱ्यांचे गाव; IAS, IPS, इंजिनीअर, डॉक्टर...प्रत्येक घरात सरकारी अधिकारी By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2024 07:34 PM 2024-09-06T19:34:14+5:30 2024-09-06T19:41:05+5:30
Administrators Village of India : 5500 लोकसंख्येच्या गावात 400 सरकारी अधिकारी अन् कर्मचारी; गावाची साक्षरता 90 टक्के Administrators Village of India : मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील दुर्गम भागात वसलेले आदिवासीबहुल पडियाल गाव 'अधिकाऱ्यांचे गाव' नावाने प्रसिद्ध आहे. इथल्या प्रत्येक मुलाचे सिव्हिल सर्व्हंट, इंजिनियर किंवा डॉक्टर बनण्याचे स्वप्न आहे. 5,000 हून अधिक लोकसंख्या असलेल्या या आदिवासी बहुल गावात 100 हून अधिक लोक भारताच्या विविध भागात प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
गावातील सुमारे 90 टक्के लोकसंख्या भिल्ल जमातीची आहे. भिल्ल समुदाय मध्य भारतातील धार, झाबुआ आणि मध्य प्रदेशातील पश्चिम निमार जिल्ह्यात आणि महाराष्ट्रातील धुळे आणि जळगावात राहतो. मध्य प्रदेश सरकारच्या दाव्यानुसार पडियाल गावाचा साक्षरता दर 90 टक्क्यांहून अधिक आहे.
दोन वर्षांपूर्वीपर्यंत या गावात प्रशासकीय अधिकाऱ्यांची संख्या 70 होती, जी 2024 मध्ये 100 च्या पुढे जाईल. यामध्ये कनिष्ठ न्यायालयाचे न्यायाधीश, भारतीय पोलीस सेवा अधिकारी, भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी, भारतीय अभियांत्रिकी सेवा अधिकारी, डॉक्टर, सरकारी वकील, वन अधिकारी इत्यादींचा समावेश आहे.
या गावातील 7 शाळकरी मुलांपैकी 4 मुलांनी NEET परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण केली, तर इतर तिघांनी JEE Mains परीक्षा उत्तीर्ण केली. या भिल्ल जमातीचे प्राबल्य असलेल्या गावातील शैक्षणिक गुणवत्ता किंवा साक्षरतेचा अंदाज यावरुन लावला गेला आहे.
राज्य सरकारने एका निवेदनात म्हटले की, या गावात प्रत्येक घरातून सरासरी एक सरकारी कर्मचारी आहे, तर एकूण 300 आहेत. स्वातंत्र्य मिळाल्यापासून येथील तरुणांनी स्पर्धा परीक्षांमध्ये बसण्याची स्पर्धा सुरू केल्याचे सांगितले जाते.
या गावात ब्लॉक रिसोर्स सेंटरचे अधिकारी म्हणून दीर्घकाळ काम करणारे मनोज दुबे म्हणाले की, गावाने सुरुवातीपासून शिक्षणावर अधिक भर दिला आहे. शाळकरी मुलांमध्ये प्रशासकीय सेवा, तंत्रज्ञान किंवा वैद्यकीय आणि अभियांत्रिकीसह इतर क्षेत्रांची आवड निर्माण केली जाते. गावातील काही तरुण तर अमेरिका, मलेशियासारख्या देशांमध्ये स्थायिक आहेत.
विविध प्रशासकीय सेवेतील सेवानिवृत्त व्यक्तींनी चालवल्या जाणाऱ्या स्मार्ट क्लासने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. पडियाल गावातील एक डझनहून अधिक सेवानिवृत्त अधिकारी शिक्षण आणि औषधोपचार यांसारख्या सार्वजनिक सेवांमध्ये गुंतले आहेत. गावात एक उच्च माध्यमिक शाळा असून, त्यामध्ये 23 शिक्षक अन् 702 विद्यार्ती आहेत.