Russia-Ukraine Crisis: रशियाचे हल्ले अन् जीवाच्या भीतीनं पळणारे युक्रेनचे नागरिक;काळीज पिळवटून टाकणारे १० फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2022 03:27 PM2022-02-24T15:27:37+5:302022-02-24T15:37:39+5:30

रशियाने लष्करी कारवाईची घोषणा केल्यानंतर युक्रेनमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत.

रशिया आणि युक्रेन यांच्यातील तणाव आता अधिकच चिघळला आहे. गुरुवारी रशियाने युक्रेनशी युद्ध सुरू केले आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा केली आहे.

रशियाने लष्करी कारवाईची घोषणा केल्यानंतर युक्रेनमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत. युक्रेनची राजधानी कीववर क्रूझ आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्यात आल्याचे वृत्त आहे.

युक्रेनची राजधानी कीवमध्ये गोळीबार आणि स्फोटाचे आवाज ऐकू आले असल्याचे वृत्त 'एएफपी' या वृत्तसंस्थेने दिले आहे. रशियाच्या हवाई दलाने युक्रेनवर एअर स्ट्राइक सुरू केला. युक्रेनच्या हद्दीत शिरलेल्या रशियन लढाऊ विमाने असल्याचा दावा करणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

युक्रेनने नागरी विमानांसाठी हवाई वाहतूक बंद केली आहे. रशियाने हल्ला केल्यानंतर कीवमध्ये गोंधळाची स्थिती आहे. शहर सोडून जाण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू आहे.

युक्रेनमध्ये दुकाने, बार, मेट्रो स्टेशन, अंडरपास, कोल्ड वॉर न्यूक्लियर शेल्टर आणि स्ट्रिप क्लबचे रूपांतर शेल्टर होममध्ये करण्यात आले आहे. मात्र, अधिकाऱ्यांनी नागरिकांना भूमिगत मेट्रो स्टेशनमध्ये शेल्टर घेण्यास सांगितले आहे. युक्रेनमध्ये पूर्व युरोपमधील सर्वात मोठे आणि सर्वात जुने भूमिगत नेटवर्क आहे.

क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर युक्रेनच्या मारियुपोल शहरात रणगाडे दिसले आहेत. याशिवाय. विमानतळाजवळील लष्कराच्या जागेतून धूर निघताना दिसत आहे. इतर शहरांतील विमानतळांवरही हल्ले झाले आहेत.

कीव शहरातून बाहेर पडण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू असल्याने रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली असल्याचे दिसून आले. युक्रेनमध्ये होत असलेल्या एअर स्ट्राइकमुळे राजधानी कीवमध्ये सायरन वाजवण्यात आले.

रशियाच्या हल्ल्याचा युक्रेनच्या सैन्याने प्रतिकार सुरू केला आहे. दरम्यान, युक्रेनच्या सैन्यानेही रशियन हवाई दलाला झटका दिला आहे. रशियाची पाच विमाने पाडली असल्याचा दावा युक्रेनच्या सैन्याने केला आहे.

रशियाने बॉम्ब हल्ले सुरू केल्यानंतर युक्रेनचे रणगाडे सक्रिय झाले आहेत. युक्रेनच्या सैन्याला अमेरिका आणि नाटो देशांनी युद्ध सामग्री पोहोचवल्याचं सूत्रांनी सांगितलंय. तसेच युक्रेनच्या सैनिकांकडून बंकरही खोदण्यात आले आहे.

युरोपियन संघाने रशियावर निर्बंधांचे सर्वात मजबूत, कठोर पॅकेज लादण्याचा निर्णय घेतला आहे. युक्रेनमध्ये आज झालेल्या लष्करी कारवाईच्या निषेधार्थ रशियावरील ही कारवाई होणार आहे.