Russia Ukraine War: पुतीन यांच्या घोषणेनंतर अमेरिकेचे ५० वर्षे जुने विमान आकाशात झेपावले; साडे चार तास घिरट्या घालत होते

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2022 07:24 PM2022-03-02T19:24:01+5:302022-03-02T19:26:31+5:30

रशिया-युक्रेन यांच्यातील युद्ध दिवसेंदिवस अधिक तीव्र होताना दिसत आहे. युक्रेननं रशियासमोर झुकणार नसल्याचं पुन्हा एकदा ठामपणे सांगितलं आहे. तर अमेरिकेनंही रशियाविरोधात कठोर आर्थिक पावलं उचलली आहेत. यातच अमेरिकेनं आकाशात एक असं विमानाचं उड्डाण केलं की ज्याची जगभर चर्चा होत आहे.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी अण्वस्त्र विभागाला हायअलर्ट राहण्याचे आदेश दिले आणि संपूर्ण जगाची चिंता वाढली. त्यानंतर अमेरिकेनं २८ फेब्रुवारी रोजी आकाशात एका अशा विमानाचं उड्डाण केलं की ज्याची चर्चा आता सर्वत्र केली जात आहे. कारण हे विमान अण्वस्त्र हल्ला देखील थोपवू शकते अशा कमालीच्या क्षमतेचे आहे. या विमानाला न्यूक्लिअर बॉम्ब रेजिसटेंड डूम्सडे प्लेन म्हटलं जातं.

डूम्सडे विमान (Doomsday) विमान हे खरंतर बोईंग-७४७ विमानाला मॉडिफाय करुन तयार करण्यात आलं आहे. बोईंग-७४७ विमानाला अधिक अत्याधुनिक करण्यात आल्यानंतर त्याचं तांत्रिक नाव बोईंग-४बी असं ठेवण्यात आलं होतं. या विमानानं २८ फेब्रुवारी रोजी नेब्रास्काच्या यूएस हवाई अड्ड्यावरुन उड्डाण घेतलं आणि साडेचार तास आकाशात घिरट्या घेतल्यानंतर ते शिकागो येथे लँड करण्यात आलं.

विशेष म्हणजे या विमानासोबत इतर काही अर्ली वॉर्निंग जेट्स देखील होते. जे कोणत्याही पद्धतीच्या बॅलेस्किट मिसाईल हल्ल्याची तातडीनं माहिती देण्यास सक्षम आहेत. डूम्सडे प्लेन हे अमेरिकी लष्कराकडून व्यवस्थापन केल्या जाणाऱ्या नाइटवॉच एअरक्राफ्टचा भाग आहे. या विभागाचं काम अमेरिकन लष्कर १९७० सालापासून चालवत आहे. या श्रेणीत अमेरिकन राष्ट्रपतींचं विमान एअरफोर्स वनचाही समावेश आहे.

अमेरिकेच्या या खास अजस्त्र विमानाची खासीयत म्हणजे अणुबॉम्ब हल्ल्यात ते खूप मदत करू शकतं. अण्वस्त्र हल्ल्याचा सामना करण्याची क्षमता या विमानात आहे आणि अशावेळी विमानात शत्रुराष्ट्राच्या विद्वंसक कारवाईला प्रत्युत्तर देण्यासाठी रणनिती आखण्यासाठी वापरण्यात येऊ शकतं. विमानत खास पद्धतीच्या सुरक्षेची व्यवस्था करण्यात आली आहे. अशी व्यवस्था इतर बोईंग विमानात आढळून येत नाही.

बोईंग ई- ४ बी विमानाची लांबी २३१ फूट इतकी आहे. तर विमानाचं विंगस्पॅन १९५.८ फीट इतका आहे. तर उंची ६३.५ फूट आहे. यात चार जनरल इलेक्ट्रिक एफ१०३ टर्बोफेन इंजिन बसविण्यात आले आहेत. विमान जास्तीत जास्त ९६९ किमी प्रतितास वेगानं उड्डाण घेऊ शकतात. तर एका वेळी हे विमान ११,५०० किमी इतका प्रवास करू शकतं. जर हवेत इंधन भरण्याची व्यवस्था झाली तर हे विमान १५० तास अधिक वेळ उड्डाण घेऊ शकतं.