पुतीन यांच्या हत्येचा कट शिजतोय, उत्तराधिकारीही ठरला; जुना सहकारीच जीवावर उठणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 09:01 AM2022-03-21T09:01:58+5:302022-03-21T09:05:41+5:30

रशियाचे अध्यक्ष पुतीन यांना संपवण्यासाठी उच्चभ्रू गट सक्रीय; हत्येसाठी तीन पर्यायांचा विचार

रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू होऊन जवळपास महिना होत आला आहे. मात्र अद्याप तरी युद्ध संपण्याची चिन्हं दिसत नाहीत. युद्धामुळे युक्रेनचं प्रचंड नुकसान झालं आहे. तर रशियाच्या अर्थव्यवस्थेलादेखील जबर फटका बसला आहे.

युक्रेनविरोधात युद्ध पुकारणाऱ्या रशियावर अमेरिकेसह युरोपियन देशांनी निर्बंध लादले आहेत. त्यामुळे रशियाचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे. अनेक बड्या कंपन्यांनी रशियातील व्यवसाय थांबवला आहे. त्यामुळे बेरोजगारी वाढली आहे.

रशियातील काही उच्चभ्रूंनी पुतीन यांनी विष देऊन मारण्याची योजना आखल्याचा दावा युक्रेनच्या गुप्तचर विभागानं केला आहे. पुतीन यांना संपवून त्यांच्या जागी नव्या व्यक्तीला अध्यक्ष केलं जाईल. पाश्चिमात्य देशांनी रद्द केलेल्या करारांना आकार देणाऱ्या व्यक्तीची निवड अध्यक्षपदी केली जाईल.

युक्रेनच्या गुप्तचर विभागाच्या प्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार, रशियातील प्रभावी गट पुतीन यांना हटवण्यासाठी कट रचत आहे. पुतीन यांच्या जागी एफएसबीचे संचालक ओलेकसँडर बोर्टनिकोव यांची अध्यक्षपदी निवड केली जाईल, असं युक्रेनच्या गुप्तचर विभागाच्या प्रमुखांनी सांगितलं.

एफएसबी ही रशियाची गुप्तहेर यंत्रणा आहे. ही यंत्रणा आधी केजीबी म्हणून ओळखली जायची. राजकारणात येण्याआधी पुतीन केजीबीचे प्रमुख होते. नंतर केजीबीचं नाव एफएसबी करण्यात आलं. आता या संस्थेचे प्रमुखे बोर्टनिकोव यांचं नाव अध्यक्षपदासाठी चर्चेत आहे. बोर्टनिकोव रशियाचे प्रमुख झाल्यास ती इतिहासाची पुनरावृत्ती ठरेल.

विशेष म्हणजे बोर्टनिकोव आणि पुतीन यांनी कधीकाळी लेनिनग्राडमध्ये एकत्र काम केलं आहे. त्यावेळी पुतीन केजीबीमध्ये होते. पुतीन यांना हटवण्यासाठी बोर्टनिकोव आणि रशियातील उच्चभ्रूंचे प्रतिनिधी काम करत असल्याचा दावा युक्रेनी गुप्तचर यंत्रणेच्या प्रमुखांनी केला.

विषबाधा, अचानक उद्भवलेला रोग किंवा कोणताही योगायोग अशा काही पर्यायांचा विचार पुतीन यांना हटवण्यासाठी सक्रीय असलेल्या गटाकडून सुरू आहे. युक्रेनविरुद्धच्या युद्धात पहिल्या तीन आठवड्यांत रशियाचं मोठं लष्करी नुकसान झालं. त्यामुळे बोर्चनिकोव नाराज आहेत. या कालावधीत त्यांनी आठ जनरल्सना पदावरून काढलं आहे.

युक्रेन युद्धात रशियाची बरीचशी गणितं चुकली. युक्रेननं बलाढ्य रशियाला कडवी झुंज दिली. त्यामुळे रशियाचं बरंचसं नुकसान झालं. त्यासाठी पुतीन यांनी बोर्टनिकोव यांना जबाबदार धरलं.

बोर्टनिकोव आणि त्यांचा गुप्तचर विभाग युक्रेनचा मूड आणि युक्रेनी सैन्याची क्षमता जोखण्यात अपयशी ठरल्याचं पुतीन यांना वाटतं. बोर्टनिकोव यांचं युक्रेनमध्ये उत्तम नेटवर्क आहे. अनेक वर्षांपासून त्यांची माणसं युक्रेनमध्ये सक्रीय आहेत.

रशियातील उच्चभ्रू गट पुतीन यांना हटवण्यासाठी काम करत आहे. पाश्चिमात्य देशांनी लादलेले निर्बंध शिथिल हवेत किंवा ते हटवले जावेत, असा या गटाचा मानस आहे. पुतीन यांना हटवण्यासाठी शिजत असलेल्या कटात पाश्चिमात्य देशातील काहींचादेखील सहभाग आहे.