Russia Ukraine Crisis: रशियाची चाल अन् जपानचा थेट इशारा; युद्धाचं सावट, जगाचं लक्ष आता युक्रेनच्या सीमेवर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2022 03:34 PM2022-02-22T15:34:15+5:302022-02-22T15:38:23+5:30

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षाने संपूर्ण जगाला हादरून सोडले आहे.

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षाने संपूर्ण जगाला हादरून सोडले आहे. एकीकडे अमेरिकेसह सर्व नाटो देशांनी रशियाच्या आक्रमक कृतीचा निषेध केला आहे, तर दुसरीकडे भारत आणि चीनसारख्या मोठ्या राष्ट्रांनी या संपूर्ण वादावर तटस्थ भूमिका घेतली आहे.

रशियाने युक्रेनमधील दोन प्रांतांना स्वतंत्र देश म्हणून जाहीर केल्यानंतर अमेरिकेकडून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागली आहे. अमेरिका रशियावर मंगळवारपासून नवीन निर्बंध लागू करणार असल्याची माहिती व्हाइट हाऊसने दिली. या निर्बंधांबाबत इतर देशांसोबतही चर्चा सुरू असल्याची माहिती व्हाइट हाऊसमधील अधिकाऱ्यांनी दिली.

युक्रेन आणि रशिया यांच्यातील तणाव गेल्या काही आठवड्यांपासून शिगेला पोहोचला आहे. आता युक्रेनमध्ये युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनमधील रशिया समर्थित फुटीरतावादी प्रदेशांचे स्वातंत्र्य मान्य केले आहे. रशियाच्या या निर्णयामुळे युक्रेनवर रशियाच्या आक्रमणाच्या पाश्चात्य देशांच्या भीतीने तणाव आणखी वाढणार आहे.

रशियाच्या निर्णयामुळे फ्रान्स, अमेरिका, जर्मनी रशियाला प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेनंही या घटनेनंतर आपत्कालीन बैठक बोलवली आहे. याचं अध्यक्षपद रशियाकडे असलं तरी रशियानं खुल्या चर्चेस मान्यता दिलेय. भारतही आपली भूमिका या बैठकीत मांडणार आहे.

जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी युक्रेनच्या सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचे कथित उल्लंघन केल्याबद्दल रशियाचा निषेध केला आहे. जपान रशियावर निर्बंधांसह इतरही कारवाई करण्याचा विचार करू शकतो असा इशारा दिला आहे.

दरम्यान, रशिया फेब्रुवारीमध्ये युक्रेनवर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचं मत अमेरिकेकडून व्यक्त केलं जात होतं. त्यांचा दावा आहे की, सुमारे 1 लाख रशियन सैन्य गेल्या आठवड्यापासून युक्रेनच्या सीमेजवळ तळ ठोकून आहेत. तर दुसरीकडे, अमेरिकन लष्करी तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, रशिया थंड वातावरण पाहता युक्रेनभोवतीचा बर्फ वितळण्याची वाट पाहत आहे.