India Pakistan: मोठा दावा! रशिया-यूक्रेन युद्धादरम्यान भारतानं पाकिस्तानवर डागली मिसाइल?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 09:11 AM2022-03-11T09:11:09+5:302022-03-11T09:22:06+5:30

जगात एकीकडे रशिया-यूक्रेन युद्धाची जोरदार चर्चा सुरू आहे. रशियानं यूक्रेनवर हल्ला करत युद्धाची घोषणा केली. गेल्या १४ दिवसांपासून रशियानं यूक्रेनवर बॉम्बहल्ले मिसाइल हल्ले केले आहेत. परंतु अद्याप यूक्रेनच्या सैन्याचा आणि नागरिकांच्या कडव्या प्रतिकारामुळे रशियाला राजधानी किव्ह ताब्यात घेता आली नाही.

रशिया-यूक्रेन युद्धादरम्यान आता पाकिस्ताननं भारताविरुद्ध मोठा दावा केला आहे. भारतानं पाकिस्तानच्या दिशेने मिसाइल डागली ती पाकच्या पंजाब प्रांतात पडल्याचा दावा पाकनं केला आहे. न्यूज एजन्सीनुसार पाकिस्तानच्या लष्करानं हे म्हटलं आहे.

पाकिस्तानी लष्करानं सांगितले की, त्यांनी भारतीय हवाई क्षेत्रातून पाकच्या हद्दीत येणाऱ्या मिसाइलचा शोध घेतला. ती पंजाब प्रांतात पडली आहे. ९ मार्चला संध्याकाळी ६ वाजून ४३ मिनिटांनी वेगवान क्षेपणास्त्र भारतीय भागातून पाकिस्तानमध्ये घुसलं आणि पंजाब प्रांतात कोसळलं असं मेजर जनरल बाबर इफ्तिखार यांनी माध्यमांना सांगितले.

भारतानं डागलेल्या या मिसाइलमुळे पाकिस्तानच्या भागात नुकसान झालं परंतु त्यात कुणाचा जीव गेला नाही असंही पाकनं स्पष्ट केले आहे. पाकिस्ताननं केलेल्या या दाव्यावर भारताने अद्याप कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. ९ मार्चला ही घटना घडली आहे.

मेजर जनरल इफ्तिखारनं म्हटलं की, अज्ञात वस्तू मिसाइल बुधवारी रात्री पंजाबच्या खानेवाल जिल्ह्यात मियां चन्नू परिसरात कोसळली. ती जमिनीवरून प्रक्षेपित करण्यात आली होती. याची माहिती मिळताच पाकिस्तानी हवाई दलाने शोध मोहीम सुरू केली.

या मिसाइलमुळे मोठी दुर्घटना होऊ शकली असंही पाकनं सांगितले. मेजर जनरल म्हणाले की, क्षेपणास्त्राच्या उड्डाणामुळे पाकिस्तान आणि भारत या दोन्ही देशांतील नागरिकांना धोका निर्माण झाला आहे. भारतानं यामागचं कारण सांगायला हवं असं पाकिस्तानं म्हटलं.

या प्रकारामुळे मोठी विमान दुर्घटना घडू शकली असती. एका प्रश्नाच्या उत्तरात पाकिस्तानी लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले की, त्या मिसाइलवर प्रतिहल्ला करुन ती पाडली गेली नाही तर ती स्वतः पडली. हे क्षेपणास्त्र ४०,००० फूट उंचीवरून जात होते.

सध्या पाकिस्तानकडून याचा तपास सुरू आहे. ही एक सुपरसोनिक मिसाइल होती. यात कुठलेही स्फोटक पदार्थ नव्हते. मिसाइल क्रॅश होण्यापूर्वी पाकिस्तानच्या १२४ किमी परिसरात उड्डाण घेतली. पाकिस्तानच्या दाव्यावर भारताची प्रतिक्रिया आली नाही.

पाकिस्तानी लष्करानं सांगितले की, आमच्या हवाई क्षेत्रात कुठल्याही प्रकारचं उल्लंघन करण्याला आमचा विरोध असेल. या प्रकाराचं जे काही कारण असेल ते भारतानं समोर येऊन स्पष्टीकरण द्यावं. इमरान सरकारविरोधात राजकीय वातावरण पेटलं असताना पाकच्या लष्करानं हा दावा केला आहे.

सध्या पाकिस्तानात इमरान खान यांचं सरकार अडचणीत आले आहे. देशातील प्रमुख विरोधी पक्षांनी मंगळवारी इमरान खान यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव संसदेत सादर केला आहे. यात देशातील अनियंत्रित महागाईसाठी सरकारला जबाबदार धरत इमरान खान यांना पदावरुन काढून टाकण्याची मागणी करण्यात आली आहे.