Russia Ukraine War: कॉमेडियन बनून देशाला हसवले, आता 'युक्रेन'साठी डोळे पाणावले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2022 03:21 PM2022-02-25T15:21:39+5:302022-02-25T15:50:45+5:30

राजकारणात येण्यापूर्वी झेलेन्स्की कला क्षेत्रात पूर्वी विनोदी-अभिनेते होते. झेलेन्स्कींचा मनोरंजन जगतापासून राजकारणापर्यंतचा प्रवास खूप रंजक आहे. कधीकाळी देशाला हसवणारा कॉमेडियन आज देशाची अवस्था पाहून डोळ्यात पाणी आणत असल्याचं दिसून येतोय.

रशिया आणि युक्रेनमधील तणाव वाढला आहे, रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यामुळे NATO देश आक्रमक झाले आहेत. मात्र, अमेरिकेनं या युद्धात सहभागी न होण्याची भूमिका स्षष्ट केली आहे.

या सर्व परिस्थितीत युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelenskyy) हे चर्चेत आहेत. संपूर्ण जगाच्या नजरा आता झेलेन्स्की आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यावर आहेत.

युक्रेनचे सहावे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांनी 2019 मध्ये युक्रेनची सत्ता हाती घेतली होती. 44 वर्षीय वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी देशाची सूत्रे हाती घेतल्यापासून ते आता सर्वात मोठ्या संकटाचा सामना करत आहेत.

राजकारणात येण्यापूर्वी झेलेन्स्की कला क्षेत्रात पूर्वी विनोदी-अभिनेते होते. झेलेन्स्कींचा मनोरंजन जगतापासून राजकारणापर्यंतचा प्रवास खूप रंजक आहे. कधीकाळी देशाला हसवणारा कॉमेडियन आज देशाची अवस्था पाहून डोळ्यात पाणी आणत असल्याचं दिसून येतोय.

युक्रेनच्या लष्कराचे कमांडर-इन-चीफ, व्हॅलेरी जालुझनी यांनी, आपण 30 रशियन टँक नष्ट केल्याचा, 7 विमाने आणि 6 हेलिकॉप्टर पाडल्याचा दावा केला आहे.

एवढेच नाही, तर 25 रशियन सैनिकांनी युक्रेनच्या सैन्यापुढे शरणागती पत्करल्याचेही जालुझनी यांनी सांगितले. याचवेळी, युक्रेनचे सैन्य खेरसॉनला वाचविण्यासाठी लढत आहे, असेही ते म्हणाले. जगभरातील नागरिक हे थांबावं, यासाठी प्रयत्न करत आहेत.

राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की हे हतबल झाल्याचं दिसून येतं. कधीकाळी देशातील नागरिकांचं मनोरंजन करणारा हा माणूस देशवासीयांच्या जीवाची पर्वा करत रडताना दिसत आहे.

झेलेन्स्की यांचा जन्म 25 जानेवारी 1978 रोजी झाला. त्यांचे वडील प्राध्यापक होते आणि आई अभियंता होती. त्यांचे आजोबा सायमन इव्हानोविच झेलेन्स्की दुसऱ्या महायुद्धात रेड आर्मीचा भाग होते.

सायमनचे वडील आणि तीन भाऊ होलोकॉस्टमध्ये मारले गेले. ज्यू कुटुंबात जन्मलेल्या झेलेन्स्कीकडे कायद्याची पदवी आहे. मात्र त्यांनी कधीच वकिली केली नाही.

व्होलोडिमिर झेलेन्स्कींनी वयाच्या 17 व्या वर्षापासून मनोरंजन क्षेत्रात काम करणे सुरू केले. त्यांच्या 'सर्व्हेंट ऑफ द पीपल' या टीव्ही शोमधून प्रचंड लोकप्रियता मिळाली. 2015 मध्ये आलेल्या या टीव्ही शोमध्ये त्यांनी शाळेतील शिक्षकाची भूमिका साकारली होती.

झेलेन्स्की यांनी स्वतः त्या शोची निर्मीती केली होती. हा शो युक्रेनमध्ये प्रचं हिट झाला. पण, यानंतर झेलेन्स्की यांनी मनोरंज क्षेत्र सोडून राजकारणात पडण्याचा निर्णय घेतला.

राजकारणात आल्यानंतर हळुहळू ते मोठे होत गेले आणि 2019 मध्ये युक्रेनचे सहावे राष्ट्राध्यक्ष बनले. सध्या संपूर्ण जगाच्या नजरा झेलेन्स्की यांच्याकडे लागल्या आहेत. या परिस्थितीची ते कशाप्रकारे सामना करतात, ते पाहणे महत्वाचे आहे.