Russia Ukraine War: रशिया-यूक्रेन युद्धामुळे भारताला महागाईचा फटका; काय महाग होणार? वाचा By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2022 01:37 PM 2022-02-25T13:37:30+5:30 2022-02-25T13:42:16+5:30
रशियानं यूक्रेनवर हल्ला केल्यामुळे अनेक देशांनी रशियावर निर्बंध लावले आहेत. गुरुवारी सकाळी रशियानं यूक्रेनसोबत युद्धाची घोषणा केली. गुरुवारी रशियानं यूक्रेनविरोधात युद्धाची घोषणा केली. त्यानंतर काही वेळातच यूक्रेनच्या अनेक शहरात स्फोटाचे आवाज ऐकायला आले. यूक्रेनवर रशियानं आक्रमक केले असून नाटो संघानेही हात वर केले आहे. अमेरिका, ब्रिटननं यूक्रेनमध्ये सैन्य पाठवण्यास नकार दिला आहे.
रशिया-यूक्रेन युद्धाचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर पडताना दिसत आहे.त्याचसोबत या युद्धामुळे भारताला महागाईचा फटका सहन करावा लागणार आहे. एकीकडे शेअर बाजार कोसळला असून दुसरीकडे क्रूड ऑईलच्या किंमतीही वाढल्या आहेत.
भलेही आता पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत त्याचा परिणाम पाहायला मिळत नसेल मात्र आगामी काळात इंधन दरवाढ होण्याची दाट शक्यता आहे. त्याचसोबत दरम्यान, पॅलेडियमची किंमतही झपाट्याने वाढू लागली आहे. पॅलेडियमचं सर्वात जास्त उत्पादन रशियात होतं.
याचा वापर पेट्रोल आणि हायब्रीड वाहन एक्झॉस्ट, मोबाईल फोन, इलेक्ट्रिक उपकरणे, दातांचे उपचार, दागिन्यांमध्ये देखील केला जातो. अशा परिस्थितीत, पॅलेडियमशी संबंधित गोष्टींवर रशिया-युक्रेन युद्धाचा काय परिणाम होईल, चला जाणून घेऊया
पॅलेडियम एक चमकदार पांढरा धातू आहे. हे प्लॅटिनम, रुथेनियम, रोडियम, ऑस्मियम, इरिडियम असलेल्या गटाचा भाग आहे. हे रशिया आणि दक्षिण आफ्रिकेत मोठ्या प्रमाणात आढळते. हे प्लॅटिनम आणि निकेलचे उत्पादन म्हणून काढले जाते.
हे जगातील सर्वात मौल्यवान धातूंपैकी एक आहे. कारण या धातूचा तुटवडा त्यामागचं प्रमुख कारण आहे. वाहनांमधून निघणाऱ्या कार्बन उत्सर्जनाबाबत सर्वच देशांच्या सरकारनं कठोर पाऊल उचलली आहेत. त्यामुळे या धातूची मागणी वाढली आहे.
मात्र, पॅलेडियमचा पुरवठा आणि मागणी यात मोठी तफावत आहे. हेच कारण आहे की त्याची किंमत सोने आणि प्लॅटिनमपेक्षा जास्त आहे. फर्म किटकोच्या वेबसाईटनुसार, आज पॅलेडियमची प्रति ग्रॅम किंमत ६ हजार १८८ रुपये इतकी आहे.
पेट्रोल आणि हायब्रीड वाहनांच्या एक्झॉस्टमध्ये वापरले जाणारे कॅटेलिटिक कन्व्हर्टर पॅलेडियमपासून बनवले जातात. २००९ मध्ये पहिल्यांदाच पेट्रोल वाहनांची विक्री डिझेल वाहनांपेक्षा जास्त झाली. ८०% पॅलेडियम कार्बन मोनोऑक्साइड, नायट्रोजन डायऑक्साइड सारख्या विषारी वायूंचे नायट्रोजन, कार्बन डायऑक्साइड सारख्या कमी हानिकारक वायूंमध्ये रूपांतरित करण्यासाठी वापरले जाते.
पॅलेडियमचा वापर फोन, दातांच्या उपचारातही होतो. एका फोनमध्ये सुमारे ०.०१५ ग्रॅम पॅलेडियम वापरले जाते. पॅलेडियम फोनच्या मायक्रोप्रोसेसर आणि प्रिटेंड सर्किट बोर्डमध्ये एम्बेड केलेले आहे. त्याचप्रमाणे, जेव्हा एखाद्याच्या दातावर 'ड्रिल आणि फिल' उपचार केले जातात, तेव्हा पॅलेडियम मिश्र धातूचा वापर क्राऊन आणि ब्रिजसाठी केला जातो.
फोनमध्ये पॅलेडियमचा वापर अगदी कमी प्रमाणात होत असला तरी फोन निर्मितीमध्येही ते आवश्यक आहे. जर युद्धामुळे रशियामध्ये पॅलेडियमची किंमत वाढली तर दक्षिण आफ्रिका देखील त्याच्या किमती वाढवू शकते. जशी याआधी कारसाठी बनलेल्या सेमीकंडक्टरबाबत परिस्थिती निर्माण झाली होती.
पॅलेडियमपासून बनवलेले दागिने खूप महाग असतात. पॅलेडियम ज्वेलरी विकणाऱ्या ग्लॅमिरा या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर ४ ग्रॅम सॉलिड पॅलेडियम रिंगची किंमत १.६९ लाख रुपये आहे. या रिंगची रुंदी ४.0mm आणि जाडी १.४mm आहे. त्यावर कंपनीचे ब्रँडिंगही लावले जाते. पॅलेडियम उत्पादनावर याचा परिणाम झाल्यास मोबाईल, पेट्रोलवरील वाहनं, दागिने महाग होऊ शकतात.