Russia Ukraine War : आता युक्रेनची बारी! रशियावर अचानक तोफगोळ्यांचा वर्षाव; एकाचा मृत्यू, सहा जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 08:05 AM2022-05-12T08:05:02+5:302022-05-12T08:11:52+5:30

Russia Ukraine War : या युद्धात युक्रेनमधील अनेक शहरं बेचिराख झाली असली तरी त्यांनी पराभव मानलेला नाही.

Russia Ukraine War : गेल्या दोन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू आहे. या युद्धाला अनेक दिवस लोटून गेले असून यात युक्रेनमधील अनेक शहरं बेचिराख झाली आहेत.

तरी युक्रेन यात पराभव स्वीकारण्यास तयार नाही. तर दुसरीकडे रशियाकडूनही अद्याप हल्ले थांबलेले नाहीत. परंतु आता रशियानं एक मोठा दावा केला आहे. युक्रेनकडून रशियावर हल्ला केल्याचा दावा रशियानं केला आहे.

यात एका रशियन व्यक्तीचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाल्याचं सांगण्यात आलं आहे. तसंच यात एक अल्पवयीनदेखील सामील असल्याचं म्हटलं आहे.

युद्धाला दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ लोटला असला तरी आतापर्यंत रशियाला युक्रेनवर ताबा मिळवता आलेला नाही. खारकीव, मारियूपोल, सुमी यासारख्या शहरांना रशियानं बेचिराख केलं आहे. असं असलं तरी रशियाला युक्रेनची राजधानी कीव्हवर ताबा मिळवता आलेला नाही.

पुतिन यांच्या लष्कराने अनेक प्रयत्न केल्यानतंरही त्यांना कीव्हमध्ये दाखल होता आलेलं नाही. म्हणून यानंतर त्यांनी आपलं लक्ष डोनबासवर केंद्रित केलं आहे.

डोनबास हा युक्रेनमधील तो भाग आहे ज्याच्या लुहान्सक आणि डोनेस्क या भागांना रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी वेगळ्या देशाच्या रुपात मान्यता दिली होती. या ठिकाणी काही फुटीरतावादी लोक राहत होते. त्यांच्या मदतीनं रशियन लष्कराला युक्रेनमध्ये शिरणं सोपं झालं.