Russia Ukraine War: जगाला जराही संशय आला नाही! रशियाने या देशांतून हळूच सोने काढले, दुसऱ्या देशांत लपविले By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2022 02:55 PM 2022-03-02T14:55:41+5:30 2022-03-02T15:08:45+5:30
Russia Ukraine War Preparation of Gold: रशियाने युक्रेन हल्ल्यासाठी चार वर्षे आधीच तयारी करण्यास सुरुवात केली होती. अमेरिका, ब्रिटनच्या ताब्यात एवढे सोने होते की रशिया भिकेला लागला असता. युक्रेनवर रशियाने हल्ला करताच युरोप, अमेरिकेसह अनेक देशांनी प्रतिबंध लावण्यास सुरुवात केली. रशियाच्या आर्थिक नाड्या आवळण्यास सुरुवात केली. परंतू रशियाने या निर्बंधांचा आधीच विचार करून ठेवला होता, हे आताच्या माहितीवरून दिसत आहे. रशियावर आतापर्यंतचा मोठा निर्बंध म्हणजे 630 अब्ज डॉलर्सचे विदेशी मुद्रा भांडार गोठविण्यात आले आहे. परंतू याचा रशियावर एवढा मोठा परिणाम होईल असे दिसत नाहीय.
रशिया या घडीला जगातील ११ वी सर्वात मोठी अर्थसत्ता आहे. या निर्बंधांमुळे रशियाच्या शेअर बाजारात भूकंप आला आहे. रशियाने याची आधीच तयारी केली होती.
रशियाचे फॉरेक्स आणि गोल्ड रिझर्व्ह त्याच्या स्वतःच्या क्षेत्राव्यतिरिक्त इतर 10 ठिकाणी जमा आहे. रशियाने गेल्या आठ वर्षांत काही परदेशी देशांमधील साठा कमी केला असला तरी काही देशांमध्ये तो लक्षणीय वाढला आहे.
कॅनडा: रशियाने आपल्या परकीय चलन आणि सोन्याच्या साठ्यापैकी 3 टक्के कॅनडामध्ये जमा केले आहे.
ऑस्ट्रिया: डिसेंबर 2013 पर्यंत, रशियाच्या फॉरेक्स आणि गोल्ड रिझर्व्हमध्ये ऑस्ट्रियामध्ये कोणत्याही ठेवी नव्हत्या. पण जून 2021 पर्यंतच्या आकडेवारीनुसार आता रशियाने तेथे 3 टक्के हिस्सा ठेवला आहे.
ब्रिटन: डिसेंबर 2013 पर्यंत, रशियाचा यूकेमध्ये 9 टक्के विदेशी चलन आणि सोन्याचा साठा होता. पण जून २०२१ पर्यंत हा आकडा ५ टक्क्यांवर आला आहे.
आंतरराष्ट्रीय संस्था: रशियाने आपल्या परकीय चलन आणि सोन्याच्या साठ्याचा हिस्सा कमी करण्याऐवजी वाढवला आहे. डिसेंबर 2013 पर्यंत, रशियाने आपल्या परकीय चलन आणि सोन्याचा साठा 2 टक्के जमा केला होता, तर जून 2021 पर्यंत हा आकडा 5 टक्क्यांपर्यंत वाढला.
अमेरिका: डिसेंबर 2013 पर्यंत रशियाचे परकीय चलन आणि सोन्याच्या साठ्यापैकी 28 टक्के हिस्सा अमेरिकेकडे होता. पण जून २०२१ पर्यंत हा आकडा ७ टक्क्यांवर आला आहे. मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे.
जर्मनी: जून 2021 पर्यंत, रशियाच्या विदेशी चलन आणि सोन्याच्या साठ्यापैकी 10 टक्के जर्मनीमध्ये उरले आहेत. डिसेंबर 2013 पर्यंत हा आकडा 17 टक्के होता.
जपान: डिसेंबर 2013 पर्यंत, जपानकडे रशियाचे विदेशी चलन आणि सोन्याच्या साठ्यापैकी फक्त 1% होते. पण नंतर जून २०२१ पर्यंत विदेशी चलन आणि सोन्याचा आकडा १० टक्क्यांपर्यंत वाढला.
फ्रान्स: डिसेंबर 2013 पर्यंत, रशियाच्या विदेशी चलन आणि सोन्याच्या साठ्यापैकी 29 टक्के फ्रान्समध्ये होते. परंतु रशियाने जून २०२१ पर्यंत ते १२ टक्क्यांवर आणले.
चीन: रशियाने 8 वर्षांत चीनमधील विदेशी चलन आणि सोन्याच्या राखीव ठेवींमध्ये मोठी वाढ केली आहे. डिसेंबर 2013 शून्य टक्के साठा असलेल्या चीनमध्ये आता 14 टक्के सोन्याचा साठा केला आहे.
डिसेंबर 2013 ते जून 2021 पर्यंत, रशियाने सोन्याच्या साठ्यात लक्षणीय वाढ केली आहे. डिसेंबर 2013 पर्यंत, रशियामध्ये सोन्याच्या साठ्याचा आकडा केवळ 9 टक्के होता, तर जून 2021 पर्यंत हा आकडा 22 टक्क्यांपर्यंत वाढला आहे.